वर्धा : गावाला वळसा घालून जाणाऱ्या नदीमुळे गावाच्या निसर्ग सौंदर्यात भर पाडणारे दृश्य आता विरळच ठरले आहे. बांध घातल्याने पाण्याचा प्रवाह आटलेला व त्याचा तळ दिसणाऱ्या पाण्यात गुरेढोरे पहुडलेली दिसावी व मृत्यूपश्चातले व अन्य विधीही त्याच पाण्यात होत असल्याने ‘गंगा मैली’ चे चित्र अनेक नद्यांवर दिसून येते. ते दूर करण्यासाठी ग्रामस्थांच्या सहभागाने नद्या स्वच्छ करण्याचा ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम सुरू होत आहे. या उपक्रमाद्वारे नद्यांना अमृत वाहिन्या करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.
हेही वाचा – नागपूर: समृद्धीला जोडणारा महामार्ग नागपूरजवळ चिखलाने माखला
जिल्ह्यातील धाम, वणा व यशोदा या तीन नद्यांचा समावेश या उक्रमाअंतर्गत झाला आहे. आज धामकुंड येथे उगमस्थळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच अभियानाच्या सुप्रिया डांगे, राहुल घुगे, भरत महोदय, मुरलीधर बेलखोडे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. येथून संवाद यात्रेस सुरवात झाली असून ४५ गावांतून प्रदूषण टाळण्याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. कीर्तनातून जलजागृती होणार आहे. आठ एप्रिलला सुजातपूर येथे नदी संगमावर समारोप आहे.