अमरावती : जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या अध्‍यक्ष आणि उपाध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीत प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू यांनी काँग्रेसच्या गटाची सत्ता उलथवलीच नव्‍ह‍े, तर स्‍वत: अध्‍यक्षपदी विराजमान झाले. काँग्रेससाठी हा मोठा धक्‍का होता. काँग्रेसच्या गटातील तीन संचालक फोडून बच्‍चू कडू यांनी ही किमया साधली खरी, पण आता बाजी पुन्‍हा उलटण्‍याचे संकेत मिळाले आहेत. काँग्रेसच्या गटातील १३ संचालकांनी मासिक सभेला अनुपस्थित राहून त्‍याची चुणूक दाखवून दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑक्‍टोबर २०२१ मध्‍ये झालेल्‍या बँकेच्‍या संचालकपदाच्‍या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, जिल्‍हाध्‍यक्ष बबलू देशमुख यांच्‍या नेतृत्‍वातील स‍हकार पॅनलचे १३ संचालक निवडून आले. त्‍यामुळे अध्‍यक्ष, उपाध्‍यक्षपदी काँग्रेसच्या गटाचे संचालक सहजरीत्‍या निवडून आले. दीड वर्षांनंतर इतर संचालकांना संधी देण्‍याची अंतर्गत व्‍यवस्‍था काँग्रेसच्या गटाने केली होती. त्‍यानुसार अध्‍यक्ष आणि उपाध्‍यक्षांनी राजीनामा दिला. या दोन पदांसाठी निवडणूक झाली. २१ सदस्यीय संचालक मंडळात काँग्रेसच्या गटाचे बहुमत असल्‍याने अध्‍यक्ष, उपाध्यक्षांचा पराभव होणे शक्यच नाही, अशा भ्रमात असलेल्‍या काँग्रेसच्या नेत्‍यांना बच्‍चू कडूंच्‍या खेळीने धक्‍का सहन करावा लागला. काँग्रेसच्या गटातील तीन संचालकांनी विरोधी भूमिका घेतल्यामुळे बच्चू कडू-अभिजीत ढेपे विजयी झाले. केवळ एका मताने माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि हरीभाऊ मोहोड यांना पराभव पत्‍करावा लागला. त्‍यानंतर आरोप-प्रत्‍यारोपांचा धुरळा उडाला. ‘खोके’ वाटपाचे आरोप झाले. त्‍यानंतर काँग्रेसच्या गटातून फुटून बाहेर पडलेल्‍या तीन संचालकांची गोची झाली. त्‍यांची नावे उघड झाली नव्‍हती. पण, बैठकीच्‍या निमित्‍ताने ही नावे उघड होणार होती. दरम्यानच्या काळात फुटीर तीन संचालकांनी स्वगृहीच थांबण्याची भूमिका घेतल्यामुळे नुकत्‍याच झालेल्‍या मासिक बैठकीला काँग्रेस गटातील १३ संचालकांनी अनुपस्थित राहण्‍याचा निर्णय घेतला. परिणामी बँकेचे अध्‍यक्ष बच्‍चू कडू यांनी बोलावलेली पहिलीच बैठक अयशस्वी ठरली.

हेही वाचा – नूह हिंसाचार : महापंचायतीला भाजपाचा आमदाराची उपस्थिती, २८ ऑगस्टला विश्व हिंदू परिषदेच्या यात्रेला पुन्हा सुरूवात!

१३ संचालकांच्‍या अनुपस्थितीमुळे गणपूर्ती झाली नाही. परिणामी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना त्या सभेची कारवाई पूर्ण करता आली नाही. सहा महिन्यांच्या आत अविश्वास आणता येत नाही, ही वैधानिक अडचण असल्यामुळे तोपर्यंत कसेबसे पुढे ढकलून बँकेची सत्ता बदलवायची रणनीती काँग्रेसतर्फे आखली जात असल्‍याचे सांगण्‍यात येते.

फुटीर तीन संचालकांची नावे चर्चेत आली, खरी पण आमदार यशोमती ठाकूर यांच्‍यासह इतर नेत्‍यांनी ती जाहीर केली नव्‍हती. जिल्‍हा बँकेतील सत्‍तांतरानंतर यशोमती ठाकूर यांनी बच्‍चू कडू यांच्‍या गटावर शरसंधान साधले होते. हा प्रकार ‘खोके’ स्‍वरूपातील असून दगाफटका करणाऱ्यांना शेतकरी कधीही माफ करणार नाहीत. ज्‍यांनी हे सर्व घडवून आणले, ते स्‍वत:ला शेतकरीपूत्र म्‍हणवितात, त्‍यांच्‍याकडे इतके खोके आले कोठून, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला होता. पण, त्‍यावर फारशी तीव्र प्रतिक्रिया बच्‍चू कडूंनी व्‍यक्‍त केली नव्‍हती, काँग्रेसमधील अंतर्गत कलहातून हे घडल्‍याचे सूचक वक्‍तव्‍य त्‍यांनी केले होते.

हेही वाचा – एका बाजूला ‘राजकीय धोंडे’ तर दुसरीकडे विकासावर मंथन

जिल्‍हा बँकेच्‍या बैठकीच्‍या निमित्‍ताने काँग्रेस गटाने अनुपस्थित राहण्‍याची भूमिका घेऊन फुटीर संचालकांना उघडे पाडण्‍याचा डाव खेळला होता. ते तीन संचालक बदनामी होईल, म्‍हणून काँग्रेसच्‍या गटात परतले आणि तिकडे बच्‍चू कडू यांना बैठक स्‍थगित करण्‍याशिवाय पर्याय उरला नाही. आता दोन्‍ही गट आमने-सामने आले आहेत. बच्‍चू कडू यांना जिल्‍हा बँकेवरील सत्‍ता टिकवून ठेवण्‍यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे, तर काँग्रेस गटाला सत्‍तांतराचे वेध लागले आहेत. बच्‍चू कडू हे सत्‍तारूढ आघाडीत आहेत. त्‍यांच्‍या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challenge before bachchu kadu in politics of cooperative sector print politics news ssb