लोकसत्‍ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : विधानसभा निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुकांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. परंतु आता अर्ज सादर करताना भरलेली अनामत रक्कम वाचविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. कारण एकूण वैध मतांच्या तब्बल एक षष्ठांश मते मिळाली तरच ही अनामत रक्कम परत मिळेल, अन्यथा ती जप्त होईल. यातील बहुतांश उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त होण्याचीच शक्यता मागील निवडणुकांचा अनुभव पाहिल्यास वर्तविण्यात आली आहे.

गेल्‍या निवडणुकीत जिल्‍ह्यातील आठ मतदारसंघांमध्‍ये ११७ उमेदवार रिंगणात होते. त्‍यातील केवळ १७ उमेदवार अनामत रक्‍कम वाचविण्‍यात यशस्‍वी ठरले. तर १०० जणांची ही रक्‍कम जप्‍त झाली. अमरावती आणि धामणगाव रेल्‍वेमधून सर्वाधिक २१ उमेदवार रिंगणात होते आणि प्रत्‍येकी १९ उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्‍त झाली. १४ च्‍या निवडणुकीत १३४ उमेदवार रिंगणात होते, यापैकी ११४ उमेदवारांना अनामत रक्‍कम वाचविता आली नाही.

आणखी वाचा-विदर्भात मतविभाजनासाठी ‘उदंड झाले अपक्ष’; ‘हरियाणा पॅटर्न’ची चर्चा

विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वसाधारण उमेदवारासाठी अनामत रक्कम १० हजार रुपये तर अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती वर्गातील उमेदवारासाठी ५ हजार रुपये इतकी आहे. निवडणुकीत जर उमेदवार निवडून आला असेल. परंतु सर्व उमेदवारांना मिळून पडलेल्या एकूण वैध मतांच्या एक षष्ठांशापेक्षा कमी मते मिळाली असल्यास विजयी उमेदवाराचीही अनामत रक्‍कम जप्त होईल.उमेदवाराला एकूण वैध मतांच्या एक षष्ठांश म्‍हणजेच १६.६७ टक्‍के मते मिळाली नाहीत, तर त्‍याची अनामत रक्कम जप्त होते. उमेदवारी अर्ज माघारीसाठी अंतिम मुदत ४ नोव्हेंबर आहे. या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येईल.

आणखी वाचा-आर्थिक घसरणीवरून राज्य सरकार लक्ष्य! शरद पवार, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका

दरम्यान, उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरवून नाकारले गेले असेल, तर अनामत रक्कम परत मिळते. उमेदवाराने विहित कालावधीत उमेदवारी मागे घेतली असल्यास सदरची रक्कम परत मिळेल. तसेच मतदानाच्या प्रारंभापूर्वीच उमेदवार मृत्यू पावला तर अनामत रक्कम त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधीस परत केली जाईल. जे उमेदवार निवडून आलेले नाहीत, मात्र निवडणुकीत सर्व उमेदवारांना पडलेल्या एकूण वैध मतांच्या एक षष्ठांशापेक्षा जास्त मते मिळाली असतील, तरीदेखील अनामत रक्कम परत मिळेल. अनामत रक्कम परत करतेवेळी एकूण वैध मतांची गणना करताना ‘नोटा’ला मिळालेली मते विचारात घेतली जात नाहीत. यावेळी किती उमेदवार रिंगणात राहतात, हे उद्या स्‍पष्‍ट होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challenge to save deposit amount for aspirants who fill independent candidature application form mma 73 mrj