जगप्रसिद्ध लेखक युवाल नोआ हरारी यांच्या ‘नेक्सस’ या सध्या गाजत असलेल्या पुस्तकातील एक वाक्य आहे. ‘माणूस सत्तेत गेल्यावर हावरट होतो व सत्तेचा गैरवापर करायला लागतो. मूलत: समाज तसा नसतो तरीही तो सत्तेमुळे वाईट झालेल्यांवर ती चालवण्याचा विश्वास वारंवार का टाकतो?’ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना नेमके याच प्रश्नाला भिडायचे आहे. त्यात ते यशस्वी होतील की नाही हे येणारा काळ ठरवेल पण आता या नियुक्तीविषयी. ती ज्या दिवशी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात होते. ते म्हणाले ‘काँग्रेसने कुणाला तरी बळीचा बकरा बनवायचे म्हणून सपकाळांची निवड केलेली दिसते’ एरवी सरळ वाटणाऱ्या या वाक्यात सत्तेतून आलेला अहंकार दडलाय. कोण हे सपकाळ असा हेटाळणीचा सूर यात आहे. सततच्या विजयामुळे पक्षात निर्माण झालेला आत्मविश्वास व त्यातून झळकणारी आक्रमकता यातून दिसते. यामुळे आपल्यासमोर काय वाढून ठेवले याची कल्पना सपकाळांना दुसऱ्याच दिवशी आली असेल. तसे त्यांचे राजकारण आदर्शवादी. गांधी, विनोबा, गाडगेबाबांच्या विचारावर चालणारे. आजकाल अशा राजकारणाला कुणी हिंग लावूनही विचारत नाही. बुलढाण्यातून सपकाळ हरतात व वादग्रस्त विधाने करणारे वाचाळवीर संजय गायकवाड निवडून येतात यातच सारेकाही आले. समाज, त्यातला मतदार नेमक्या कोणत्या दिशेने झुकलाय? चांगले वा वाईट ठरवण्याची त्याची पद्धत किती बदललेली हेच यातून दिसते. म्हणून सपकाळांसमोरील आव्हान दुहेरी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सपकाळांना पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांची मानसिकता तर बदलावी लागेलच पण समाजाला सुद्धा आदर्शवादी विचाराच्या दिशेने न्यावे लागेल. यातून एक प्रश्न उभा ठाकतो तो म्हणजे सध्याच्या परिस्थितीत हे सहज शक्य आहे का? याचे उत्तर भले भले देऊ शकणार नाहीत. तरीही त्यांना नेमण्याचा काँग्रेसचा निर्णय योग्य ठरतो. त्याची कारणेही अनेक. अलीकडे सर्वच पक्षाचे राजकारण गढूळ झालेले. स्वार्थ व तडजोडीला महत्त्व देणारे. पक्षापेक्षा स्वहित कसे साधता येईल यावरच प्रत्येकाचा भर. त्याचा मोठा फटका काँग्रेसला सध्या बसतोच. सततचा पराभव पदरी पडूनही या पक्षाचे नेते क्षुल्लक फायद्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या आमिषाला बळी पडतात. निवडणुकीत तडजोडी करतात. यामुळे रस्त्यावर उतरून सत्तेचा विरोध करण्याची क्षमताच संपून गेलेली. सत्ताधारी सत्तेचा कसा दुरुपयोग करतात हे लोकांना पटवून देण्याचे काम सुद्धा थांबलेले. निवडणुकीतील यश तर दूरच राहिले. सपकाळांची निवड या पार्श्वभूमीवर सार्थ ठरते ती यासाठी की ते स्वत: तडजोडवादी नाहीत. जे हे करायला तयार होत नाहीत त्यांच्यावर कारवाईचा वरंवटा फिरवण्याची वाईट प्रथा सत्ताधाऱ्यांनी रूढ केेलेली. सपकाळांविरुद्ध तीही करता येत नाही कारण त्यांच्याकडे कारवाई होईल असे काहीही नाही. म्हणजे शिक्षण संस्था नाही, व्यवसाय नाही. त्यामुळे ते ताकदीचा विरोध करूनही सत्ताधाऱ्यांना पुरून उरू शकतात. निवडणुकीतील यश दूरची गोष्ट राहिली. आधी संघटनात्मक बांधणी तर करू हाच विचार पक्षाने या नियुक्तीसाठी केलेला दिसतो. जो सध्याच्या स्थितीत योग्य ठरतो. आता मुद्दा आहे तो सपकाळांच्या नेतृत्वात काँग्रेस बदलेल का?

सत्ता नसली तरी या पक्षाच्या नेत्यांना अनेक वाईट सवयींनी सध्या ग्रासलेले. राजकारणात राहून व्यवसायिक हित साधून घ्यायचे. केवळ देखाव्यापुरता विरोध करायचा. सामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर केवळ माध्यमांसमोर बकबक करायची. प्रत्यक्ष कृती करायची नाही. प्रत्येकवेळी पराभव झाला तरी बेहत्तर पण पदाला चिकटून राहायचे. आपल्याकडून ते जात असेल तर जो कुणी दुसरा येईल तो मर्जीतला असेल याची व्यवस्था करायची. पक्षापेक्षा पैशाला महत्त्व द्यायचे. घराणेशाहीला प्राधान्य द्यायचे. लक्ष्यावर आधारित कामे करायची नाहीत. संघर्ष टाळायचा. गावापासून राज्यपातळीपर्यंत नेते व कार्यकर्त्यांमध्ये रुजलेल्या या वाईट सवयी सपकाळ खरोखर मोडून काढतील का? ते आदर्शवादाच्या गोष्टी सांगू लागतील तेव्हा सारा पक्ष त्यांच्या पाठीशी उभा ठाकेल का? की आज जशी आदर्श विचाराची खिल्ली उडवली जाते तशी त्यांचीही उडवली जाईल? या पक्षात ठिकठिकाणी जे संस्थानिक तयार झालेले आहेत ते सपकाळांना कसा प्रतिसाद देतील? नव्या रक्ताला वाव देण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले तर जुनी खोडे नेमके काय करतील? याच्या उत्तरात त्यांचा भविष्यकाळ दडलेला. सपकाळांची राहणी साधी. ते आजही दादरच्या आश्रमात उतरतात व जमिनीवर झोपतात. याचे कौतुकच. सध्या ते होतेही आहे. मात्र या आचरणाचा आदर्श पक्षातील कार्यकर्ते व नेते खरेच घेतील का? मुळात असे आदर्शवादाचे अनुकरण करणारे लोक या पक्षात शिल्लक तरी आहेत का? अशा स्थितीत सपकाळ एकीकडे व सारे दुसरीकडे असे चित्र भविष्यात निर्माण झाले तर तो राहुल गांधी यांचा पराभव ठरेल.

वर राजकीय पक्षातील गढूळ राजकारणाचा केलेला उल्लेख राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा लागू होतो. सततच्या विजयामुळे आक्रमक झालेले सत्ताधारी लोकमानस स्वत:च्या बाजूने कसे राहील यासाठी सामदामदंडभेद नीतीचा वापर करतात. सरकारी यंत्रणा यथेच्छपणे वापरून घेतात. सत्तेच्या बळावर निर्माण केलेली कार्यकर्त्यांची फळी कायम कशी सक्रिय राहील याची काळजी घेत असतात. या कार्यकर्त्यांना काय हवे याची पूर्ण दक्षता घेतात. साहजिकच यासाठी लागतो तो पैसा. तो पाण्यासारखा ओतला जातो. नुसत्या राजकारणात नाही तर समाजकारण घडवण्यासाठी मदत करणाऱ्या प्रत्येक उपक्रमात. यातून पक्षीय विचारधारेला जे अनुकूल वातावरण तयार होते त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत मिळतो. यामुळे समाजाला भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नांना व्यासपीठच मिळत नाही. ते मिळू नये अशीच तजवीज सत्ताधाऱ्यांकडून केली जाते. धर्म व भावना याला उत्तेजन कसे मिळेल यावरच त्यांचा रोख असतो. या अशा उन्मादी वातावरणाला छेद देत व पैसा नसताना पक्षासाठी जागा निर्माण करण्याचे अवघड आव्हान सपकाळांपुढे आहे. आदर्शवाद हा आक्रमकतेवर मात करू शकतो हे खरे. ब्रिटिशांच्या विरुद्ध गांधींनी याच बळावर विजय मिळवला. मात्र तेव्हा त्यांना समाजाची साथ मिळाली. समर्पित कार्यकर्त्यांची फळी त्यांच्यासोबत होती. सपकाळांजवळ सध्यातरी यातले काहीही नाही. आहे ती जिद्द व अजूनही काँग्रेसचा विचार मानणारा मतदार. त्याला सोबत घेत नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना मदतीला घेऊन ते सध्यातरी अशक्यप्राय वाटणारा गड सर करू शकतील का? आज प्रचार आणि प्रसारात सत्ताधाऱ्यांनी आघाडी मिळवलेली. त्यामुळे गांधी किती वाईट यावर तावातावाने बोलणारी नवी पिढीच तयार झालेली. हा प्रचार खोटा आहे हे पटवून देण्यासोबतच धर्मनिरपेक्षतेचे मूळ तत्त्वच कसे देशाला समोर नेऊ शकते हे समाजाला समजावून सांगण्याची जबाबदारी सपकाळांवर आली आहे. ती ते पार पाडतील का, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.

devendra.gawande@expressindia.com