खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसवासी झालेले नाना पटोले यांच्यासमोर जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांचे आव्हाने  उभे राहण्याची शक्यता आहे. काँग्रेस-भाजप आणि पुन्हा काँग्रेस असा प्रवास करणारे पटोले यांचे पक्षश्रेष्ठींनी स्वागत केले असले तरी स्थानिक नेत्यांना ते फारसे पचनी पडले नाही.

पेटोल यांनी थेट काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी संपर्कात राहून पक्षात प्रवेश केला. परंतु भंडारा आणि गोंदिया जिल्ह्य़ातील काँग्रेसचे प्रस्थापित नेते त्यांना कितीपत साथ देतात. यावर त्यांची पुढची वाटचाल सुकर होणार आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांचा थेट संबंध तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी होता. परंतु भंडारा जिल्ह्य़ातील साकोली विधानसभा मतदार संघातील उमेदवारीवरून मतभेद झाले होते. जिल्ह्य़ात शाळा-महाविद्यालयाच्या माध्यमातून तगडे ‘नेटवर्क’ असलेले काँग्रेस नेते व माजी आमदार सेवक वाघाये यांना साकोलीची उमेदवारी निश्चित होणार हे स्पष्ट झाल्यानंतर पटोले यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला होता. जिल्हा राजकारणात वाघाये हे पटोले यांना ‘सिनिअर’ आहेत. ते दोनदा पराभूत झाले आहेत. परंतु त्यांनी काँग्रेस सोडली नाही. पटोले यांचा प्रवास काँग्रेस, भाजप आणि पुन्हा काँग्रेस असा आहे. तेव्हा पक्ष त्यांना जिल्ह्य़ात किती पाठबळ देईल यावरच त्यांचे स्थानिक राजकारणाचे भवितव्य ठरणार आहे.

माजी आमदार सेवक वाघाये यांची साकोली मतदार संघावर दावेदारी आहे तर पटोले यांचाही कल विधानसभा निवडणूक लढण्याकडे आहे. जातीच्या समीकरणाचा विचार केल्यास हे दोघेही एकाच समाजाचे (ओबीसी)आहेत. या दोन्ही नेत्यांचा मतदारसंघ एकच असल्याने पेटोले यांना स्वपक्षीय नेत्यांची जिल्ह्य़ातील आव्हाने पेलावी लागणार आहे. पटोले आणि वाघाये यांच्यात जिल्ह्य़ातील वर्चस्वावरून याआधीही संघर्ष झाला आहे. जिल्ह्य़ात आणखी एक प्रस्थापित नेते आहेत. माजी मंत्री बंडू सावरबांधे. त्यांचीही जिल्ह्य़ावर चांगली पकड आहे. त्यांचा मतदार संघ आरक्षित झाला आहे.

भंडारा जिल्ह्य़ांचा विचार करता पक्ष प्रस्थापित नेत्यांना प्राधान्य देतात की, नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांना महत्व देतात. यावर सारेकाही अवलंबून आहे. हे दोन्ही नेते जिल्हा परिषदेच्या जागावाटपासून तर पक्षीय राजकारणात वजन ठेवून आहेत. भंडारा-गोदिंया लोकसभा मतदार संघाचा विचार करता वरिष्ठ आमदार गोपालदास अग्रवाल हे पक्षाचे दुसरे नेते आहेत. त्यांना जिल्ह्य़ातील राजकारणात कुणाचा हस्तक्षेप नको आहे.

विदर्भात मुकुल वासनिक, विलास मुत्तेमवार, विजय वडेट्टीवार, नरेश पुगलिया आदी नेते पेटोले यांना पटोलेंच्या पक्ष प्रवेशाने आनंद झाल्याचे दिसत नाहीत. पक्षात वरचे स्थान मिळाले नसल्यास पटोले यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला मर्यादा येतील. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याची दिसत आहे. अशावेळी जागा वाटपात पटोले यांना पक्षाने महत्व न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ होण्याची शक्यता आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्य़ातील काँग्रेसचे प्रस्थापित नेते पटोले यांना सहकार्य करण्याची शक्यता कमी आहे. शिवाय प्रफुल पटेल सारखे स्थान पटोले यांना काँग्रेस देण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे स्थानिक राजकारणात पटोले यांच्यासमोर भविष्यात अडचणींचा डोंगर उभा राहणार आहे.

दरम्यान पटोले यांच्यासाठी साकोलीची जागा मोकळी करण्यासाठी सेवक वाघाये यांना लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्यास सांगण्यात येत आहेत. परंतु वाघाये यासाठी फारसे इच्छुक नाहीत. त्यांना आपला मतदार संघ सोडायचे नाही. मात्र पक्षश्रेष्ठीकडून आदेश आल्यास ते निवडणूक लढतील. पण पटोले यांना मतदारसंघात संघर्षांची स्थिती कायम राहणार आहे.