नागपूर: शिंदे – फडणवीस – अजित पवार महायुती सरकारचा आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार येत्या एक महिन्यात होण्याचे संकेत मिळाले असून यावेळी नागपूर जिल्ह्यातूंन भाजपचे हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. उद्या या संदर्भात बैठक होण्याची शक्यता आहे.
शिंदे -फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा एक वर्षापासून सुरू आहे. शिंदे गट व भाजपमधील इच्छुक यासाठी मोर्चेबांधणी करीत असतानाच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीतील आमदाराच्या एका गटाने सरकारला पाठिंबा दिला.
९ जणांनी मंत्री करण्यात आले. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील इच्छुकांच्या पदरी निराशा आली. त्यामुळे दोन्ही गटातील काही आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे.त्यासाठी पुढच्या काळात मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित असल्याचे भाजप वर्तुळातून सांगितले जाते. या विस्तारात नागपूर जिल्ह्यातून कोण असेल याची चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमधून खुद्द फडणवीस हे उपमुख्यमंत्री असल्याने ग्रामीणमधून एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. ग्रामीण मधून हिंगण्याचे आमदार समीर मेघे हे मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहे. ते सलग दुसऱ्यांदा हिंगण्यातून निवडून आले असून ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात.