नागपूर : ऑगस्ट महिन्यात मोठ्या ‘ब्रेक’नंतर सप्टेंबरमध्ये पाऊस आला तरी म्हणावा तसा पावसाला जोर नाही. मात्र, आता वायव्य बंगालच्या उपसागरात पश्चिम बंगाल आणि ओडिशाजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा ओडिशावरून दक्षिण झारखंडच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोसमी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुढील तीन दिवस राज्यातील विदर्भ, मराठवाड्यात पाऊस होण्याची शक्यता असून विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मुळधार पावसाची, तर राज्यात आज बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आजपासून विदर्भात, २१ तारखेपासून मराठवाड्यात व २२ तारखेपासून मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते अतिहलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात आज तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा – ऐन गणेशोत्सवात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; यवतमाळ जिल्ह्यतील विदारक चित्र

विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात पुढील तीन दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर नागपूरला २२ आणि २३ तारखेला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढील २३ तारखेपर्यंत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘कॉमन क्रेन’च्या तस्करीचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत

अमरावती, वर्धा येथे २२ तारखेला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मराठवाड्यातील बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली येथे पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव येथेही ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस मुंबईत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Story img Loader