नागपूर : गेल्या काही वर्षांपासून देशभरात अवकाळी पावसाचे थैमान सातत्याने दिसून येत आहे. या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्रातदेखील अवकाळी पावसाची अधूनमधून हजेरी लागत आहे. अशातच आता काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा नववर्षाच्या स्वागताला अवकाळी पावसाची हजेरी राहण्याची शक्यता आहे.
तमिळनाडू राज्यात वर्षाच्या अखेरीस आणि नववर्षाच्या सुरुवातीला असे दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही भागांत अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर पश्चिम राजस्थान, उत्तर प्रदेशमधील काही भाग आणि दिल्लीच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
खासगी हवामान संस्थेच्या अंदाजानुसार तमिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, देशाच्या अनेक भागांत हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये दाट धुके दिसून येत आहे. महाराष्ट्रातदेखील अनेक भागांत धुक्यांची चादर पसरलेली दिसून येत आहे.