नागपूर : बदलत्या वातावरणामुळे सारेच त्रस्त असून गरम कपडे घालायचे की रेनकोट सोबत ठेवायचा, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. देशभरातच वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वातावरणात बदल झाला आहे. परिणामी थंडीची जागा आता ढगाळ वातावरणाने घेतली आहे. राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. तर ही परिस्थिती कायम राहणार असून पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
आजपासून बुधवारपर्यंत राजस्थान व मध्यप्रदेशच्या पश्चिम भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात कडाक्याची थंडी असली तरीही काही भागांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच उत्तर भारतातसुद्धा काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस पंजाब, चंदीगड, दिल्ली, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश तसेच गुजरात, मध्यप्रदेश येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा – यवतमाळ : महिला, मुली असुरक्षित! अत्याचार, विनयभंगाचे ७१५ गुन्हे, २५० आरोपी मोकाट
हेही वाचा – गडचिरोली : दारूबंदीवरून विरोधासह समर्थनाचेही सूर! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना साकडे
तमिळनाडूत काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी साधारण पावसाची शक्यता आहे. केरळमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. राज्यातील धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर पुण्यासह कोल्हापूर, जळगाव, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांतही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.