चंद्रपूर : अयोध्येत श्री रामचंद्राचे भव्य मंदिर साकारत नाही, तोवर पायात पादत्राण न घालता अनवाणी फिरण्याची भीष्मप्रतिज्ञा भद्रावती येथील चंद्रकांत गुंडावार यांनी केली होती. ती त्यांनी सलग ३२ वर्षे जपली. हा संकल्प पूर्णत्वास गेला. मात्र, २० जानेवारी २०२४ रोजी स्व. निळकंठराव गुंडावार यांच्या जयंतीदिनी गुंडावर यांनी पुन्हा एक प्रतिज्ञा घेतली. बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेत नाही किंवा केंद्र व राज्यात महत्त्वाच्यापदी त्यांची वर्णी लागत नाही, तोवर चप्पल न घालता अनवाणी फिरण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भद्रावती येथील लोकसेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपचे पदाधिकारी चंद्रकांत गुंडावार यांच्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार हे राजकारणातील आदर्श व्यक्तीमत्व आहेत. गुंडावार यांनी ३२ वर्षांपूर्वी ६ डिसेंबर १९९२ या दिवशी राम मंदिर होणार नाही तोवर पायात पादत्राण घालणार नाही, असा संकल्प केला होता. विशेष म्हणजे, कारसेवेच्या दिवशी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली होती, त्यानंतरच गुंडावार यांनी हा संकल्प केला होता. हा संकल्प पूर्ण झाल्यांनतर २० जानेवारीला गुंडावार पादत्राण घालणार होते. निमित्त होते स्व. निळकंठराव गुंडावार यांच्या जयंती समारोहाचे व लोकसेवा शिक्षण मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे. या निमित्ताने भद्रावती येथे एका कार्यक्रमाचे आयोजनदेखील करण्यात आले. या कार्यक्रमाला उद्घाटक व सत्कार मूर्ती म्हणून स्वत: माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. या कार्यक्रमातच गुंडावार यांनी नवा संकल्प केला.

हेही वाचा >>>राज्य निवडणूक आयुक्तांचे नागपूर कनेक्शन काय आहे?

राज्याचे मंत्री म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार शपथ घेत नाही किंवा केंद्र व राज्य स्तरावर एखाद्या मोठ्या पदावर त्यांची नियुक्ती करीत नाही, तोवर पादत्राणे घालणार नाही, असा संकल्प त्यांनी यावेळी केला. मुनगंटीवार यांनी गुंडावार यांची समजूत घातली. हा निर्णय घेऊ नका, असा प्रकार चुकीचा आहे, असेही सांगितले. मात्र गुंडावार यांनी, संकल्प केला आहे, त्यामुळे आता माघार नाही, असे सांगितले.

विशेष म्हणजे, गुंडावार यांनी २९ ऑक्टोबर २०२४ ला अयोध्येत राम मंदिराला भेट देत श्रीरामचंद्राचे दर्शन घेतले होते. संकल्पपूर्ती झाली म्हणून २० जानेवारी रोजी कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, आता मुनगंटीवार मंत्री होत नाही किंवा वरिष्ठ पदावर वर्णी लागत नाही तोवर पादत्राण घालणार नाही, हा नवा संकल्प त्यांनी केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant gundawar made this resolution for sudhir mungantiwar ministerial post rsj 74 amy