गडचिरोली : एकनाथ शिंदे बंडखोरी करणार आहेत. याबद्दल पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना माहिती होती. म्हणूनच बंडखोरीच्या महिन्याभरापूर्वी उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना बोलावून घेतले व तुला मुख्यमंत्री व्हायचे आहे काय, अशी विचारणा केली होती. असा गौप्यस्फोट शिवसेनेचे(ठाकरे) नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
हेही वाचा… महिला पोलिसाची हत्या करून रेल्वेने पळून जाणाऱ्या दोघांना नागपुरात अटक
गडचिरोली येथे शिवगर्जना अभियानानिमित्त ते आले होते. यावेळी पत्रपरिषदेत माहिती देताना ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची लालसा होती. त्यासाठी ते कोणत्याही क्षणी बंड करणार, हे उध्दव ठाकरे यांना ठावूक होते. म्हणूनच सत्तापरिवर्तनाच्या महिनाभरापूर्वी उध्दव ठाकरे यांनी शिंदेंना बोलावून घेतले व तुला मुख्यमंत्रीपद हवे काय अशी विचारणा केली. मात्र, त्यावेळेस त्यांनी नाही असे उत्तर दिले होते. परंतु काही दिवसांनी बंडखोरी केली. ‘खोके’ आणि सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली, असे खैरे म्हणाले. यामागे देवेंद्र फडणवीस यांचा हात असून शिवसेना पक्ष संपवण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले. असा आरोपही खैरे यांनी केला.