शिवसेना नेते खैरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
स्वतंत्र मराठवाडय़ाची भाषा केल्याबद्दल अ‍ॅड. श्रीहरी अणे यांना मराठवाडय़ात पाय ठेवू देणार नाही, या शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्यावर विदर्भवादी नेते संतप्त झाले आहेत. खैरे यांनी पोलीस संरक्षणाशिवाय तीन दिवस गडचिरोली जिल्ह्य़ात घालवून दाखवावे, असे प्रतिआव्हान विदर्भवाद्यांनी दिले आहे. मात्र, या वादात खुद्द अणे यांनी शांततेची भूमिका घेतली आहे. खैरे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने ते असे बोलत आहेत, त्यांच्या भावना समजून घ्या, असे प्रतिपादन अणेंनी केले.
मराठवाडय़ात जाऊन स्वतंत्र राज्याची मागणी केल्याने अ‍ॅड. श्रीहरी अणे यांना शिवसेनेने लक्ष्य केले आहे. अणे यांना मराठवाडय़ात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा सेनेचे खासदार चंद्रकात खैरे यांनी दिला आहे. काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनीही अणे यांच्यावर टीका केली आहे. याबाबत तीव्र प्रतिक्रिया विदर्भात उमटल्या आहेत. राणे यांचा पुतळा दोन दिवसांपूर्वीच जाळण्यात आला. शनिवारी अणे नागपुरात आल्यावर त्यांच्या सभेतही खैरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटल्या. खैरे यांनी कोणतेही पोलीस संरक्षण न घेता तीन दिवस गडचिरोली जिल्ह्य़ात राहून दाखवावे, असे प्रतिआव्हान विदर्भवादी नेते व माजी आमदार वामनराव चटप यांनी दिले. नक्षलवाद्यांनी बंदूक दाखवताच खैरे यांना पळता भुई थोडी होईल, संयुक्त महाराष्ट्राची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने प्रथम तेलंगणात गेलेली १४ मराठी भाषिकांची गावे महाराष्ट्रात आणावीत, असे चटप म्हणाले. मात्र खुद्द अ‍ॅड. अणे यांनी खैरेंच्या वक्तव्यावर शांततेची भूमिका घेतली. खैरे हे प्रगल्भ नेते आहेत, त्यांना असे वक्तव्य का करावे लागले, ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. एखाद्या नेत्याच्या पायाखालची वाळू जेव्हा सरकायला लागते तेव्हा ती टिकवून ठेवण्यासाठी अशी भूमिका घ्यावी लागते, असे ते म्हणाले. त्यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या ‘अणेंचा बोलविता धनी कोण?’ या वक्तव्याचाही समाचार घेतला. आपण सुरुवातीपासूनच विदर्भवादी आहोत, आजोबा हे नागपूरचे खासदार होते, काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. ते कट्टर विदर्भवादी होते. मी सध्या कोणत्याही पक्षात नाही, असे ते म्हणाले.

Story img Loader