चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील, नांदा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव अनिल मुसळे यांनी एकाच वेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक व शाळेत मुख्याध्यापक अशी दोन पदांवर नोकरी करून दोन्ही ठिकाणी पगार उचलून शासनाची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे खोटे अनुभव प्रमाणपत्र जोडून शाळेत मुख्याध्यापक पद बळकावल्याचे चौकशीत उघडकीस आले असून सात दिवसात मुसळे यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी चंद्रपूरचे शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय यापूर्वीही बोगस शिक्षक भरती प्रकरणामुळे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ही शाळा संचालित करणाऱ्या संस्थेचे सचिव अनिल मुसळे यांनी स्वतःचीच मुख्याध्यापक पदी केलेली नियुक्ती बोगस असल्याचे शिक्षण विभागाच्या चौकशीत सिद्ध झाले आहे. मुख्याध्यापक अनिल मुसळे यांची नियुक्ती रद्द करण्याचा प्रस्ताव सात दिवसात सादर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी चंद्रपूरचे शिक्षणाधिकारी यांना दिला आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच माजी जिल्हा परिषद सदस्यांची पत्नी योगिता कुडमेथे व संस्थेचे सचिव मुख्याध्यापक डॉ.अनिल मुसळे या दोघांवरही शिक्षिकेची बोगस भरती केल्या प्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली होती. सध्या अनिल मुसळे जामिनावर बाहेर आहेत. मात्र अशातही मुसळे यांची बनवाबनवी सुरूच आहे. यावेळी तर मुसळे यांनी चक्क राज्य शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

हेही वाचा – देशी कारागिरांना भरभरून प्रतिसाद, तब्बल दहा लाखाची विक्री

सविस्तर असे की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, नांदा द्वारा संचलित श्री. प्रभू रामचंद्र विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, नांदा या शाळेचे मुख्याध्यापक पदी डॉ. अनिल रामचंद्र मुसळे रुजू होण्यापूर्वी ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर येथील मुख्य शाखेत कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. त्यांना मुख्याध्यापकपदी रुजू व्हायचे असल्याने त्यांनी ७ फेब्रुवारी २०१० ला लिखित राजीनामा बँकेकडे सादर केला. बँकेच्या प्रक्रियेनुसार संचालक मंडळांनी ८ जून २०११ ला राजीनामा मंजूर करून त्यांना बँकेच्या सेवेतून सेवामुक्त केले. मात्र बँकेतून सेवा मुक्त व्हायच्या अगोदरच १८ मार्च २०१० ला मुसळे यांनी नांदा येथील शाळेत मुख्याध्यापक पदाचा प्रभार स्वीकारला. १८ मार्च २०१० ते ८ जून २०११ पर्यंत ते बँकेच्या सेवेत कार्यरत होते. त्यामुळे अनिल मुसळे यांची मुख्याध्यापक पदावरील नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे शिक्षण उपसंचालकांनी अहवालात म्हटले आहे. राजीनामा दिल्यानंतरही मुसळे यांनी सेवेतून मुक्त होईपर्यंत सलग १५ महिने बँकेकडून वेतन उचलले. त्यामुळे ८ जून २०११ पर्यंत ते बँकेत कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे. अशा प्रकारे मुसळे यांनी एकाच वेळी कनिष्ठ लिपिक व मुख्याध्यापक पदावर काम करून दोन्ही पगार उचलून शासनाची दिशाभूल केली. तसेच शिक्षण विभागाच्या नियमानुसार मुख्याध्यापकपदी नियुक्तीसाठी किमान पाच वर्ष सहाय्यक शिक्षकाचा अनुभव असणे आवश्यक आहे. मुसळे यांनी तुकडोजी महाराज विद्यालय भालर, भास्करराव ताजने माध्यमिक विद्यालय कळमना, गुलाब नबी आझाद ज्युनिअर कॉलेज बार्शी या तीन शाळांचा ५ वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र जोडले आहे. मात्र चौकशी अंती एकाही ठिकाणी त्यांच्या पदाला वैयक्तिक मान्यता प्राप्त नसल्याचे आढळून आले. यावरून अनुभव प्रमाणपत्र बोगस असल्याचे शिक्षण उपसंचालकांनी अहवालात म्हटले आहे.

बोगस अनुभव प्रमाणपत्र जोडून मुख्याध्यापक पद बळकावणारे मुसळे यांच्यावर सात दिवसात कारवाई करावी असे शिक्षण उपसंचालकांनी चंद्रपूरचे शिक्षणाधिकारी यांना म्हटले आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी हे संस्थेचे पदाधिकारी व संचालकांवर विश्वास ठेवून शाळेसंदर्भात कार्यवाही करीत असतात. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, नांदा या संस्थेने शासनाची वेळोवेळी दिशाभूल केली असून १४ वर्षांपूर्वी झालेली नियुक्ती अवैध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुख्याध्यापक बोगस नियुक्ती प्रकरणात संस्थेलाही तेवढेच जबाबदार समजण्यात येत आहे. तसेच सर्व संचालकांवर कारवाई करावी अशी मागणीही केली आहे.

हेही वाचा – युद्धग्रस्त इस्रायलसाठी राज्यातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण ! कुशल कामगारांचा तुटवडा असल्याचे कारण

अहवालात प्रत्येक सभेच्या ठरावावर व कर्मचारी नियुक्त्यांवर अध्यक्षांच्या बनावट सह्या मारल्या जात असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. माजी शिक्षक आमदार ना.गो. गाणार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली असून शिक्षणाधिकाऱ्यांच्या भूमीकेकडे संपूर्ण शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.

शिक्षक पद भरतीची चौकशी करावी

प्रभू रामचंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ.अनिल मुसळे हे संस्थेचे सचिव आहे. सचिव पदाचा गैरफायदा घेऊन बनावट दस्ताऐवज तयार करून त्यांनी स्वतःची मुख्याध्यापक पदी नियुक्ती करून घेतली. याच शाळेतील बोगस शिक्षिका भरती प्रकरण काही दिवसापूर्वी उघडकीस आले होते व या प्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शासनाने या शाळेच्या पदभरतीची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

दोषींवर कारवाई करा

मी स्वतः संस्था अध्यक्ष असून नियुक्त्या व ठरावावर माझ्या बनावट सह्या केल्या आहे. विविध बँकांमध्ये १४ खाती उघडली आहे. यामधून मोठी आर्थिक अफरातफर झाल्याचे सिद्ध झाले आहे. प्रत्येक ठिकाणी माझ्या बनावट सह्यांचा दुरुपयोग केलेला असून संपूर्ण संचालक मंडळांना अंधारात ठेवण्यात आले आहे. अंतिमत: गैरप्रकार उघडकीस आला असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी हीच संस्थेची मागणी आहे. – सुनीता लोढिया, अध्यक्ष, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, नांदा

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur a single person at the same time a principal in a school and also a clerk in a bank rsj 74 ssb