चंद्रपूर: अंध वडिलांना घेऊन आई सेवाग्राम येथे उपचारासाठी गेल्याने विवाहित महिला वडिलांच्या घरी एकटी होती. यादरम्यान अज्ञात आरोपीने शस्त्राने वार करून तिचा खून केल्याची घटना बुधवार २६ जूनच्या रात्री घडली. मृत महिलेचे नाव आरती दिगंबर चंद्रवंशी (२४) असे आहे. श्रद्धेय बाबा आमटे यांच्या आनंदवन येथील अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आरती हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. परंतु काही दिवसांपासून ती आपल्या आई -वडिलांकडे वास्तव्याला होती. घटनेच्या दिवशी बुधवार २६ जून रोजी महिलेचे वडील आपल्या पत्नीसोबत सेवाग्राम येथे उपचारार्थ गेले होते. जेव्हा रात्री आई -वडील घरी पोहोचले तेव्हा मुलीचे शव बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. मृतक महिलेच्या गळ्यावर शस्त्राचे वार दिसून आले. घटनास्थळी रक्त साचले होते. पोलीस विभागाला माहिती कळविण्यात आली. लागलीच पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे घटनास्थळी दाखल झाले. घटनेची पुढील चौकशी सुरु केली.
गुरुवार २७ जून रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचे निरीक्षण करून मृतक महिलेच्या वडिलांची विचारपूस करून माहिती घेतली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. नेमकी घटना कशी घडली, कोणत्या कारणावरून खून करण्यात आला याबाबत पोलिसांनी तपासाची चक्र फिरविली आहेत. आनंदवन हे सुजाण नागरिकांचे आश्रयस्थान असून या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती समाजकार्यात व्यस्त असतात. त्यातच ही हत्येची घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. विशेष म्हणजे श्रद्धेय बाबा आमटे यांनी आनंदवनाची निर्मिती केल्यापासून आतापर्यंत कधीही आनंदवनात अशी विदारक खुनाची घटना कधी घडली नाही. त्यामुळे आनंदवन कुटुंबाला देखील या घटनेचा मोठा धक्का बसला आहे.
या घटनेची माहिती मिळताच आम्ही सखोल चौकशी सुरु केली आहे. तपास पूर्ण होण्यास जवळपास १७ तास लागतील, अशी माहिती सहा. पोलीस अधीक्षक तथा वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी दिली. या घटनेच्या तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरविली जात असून लवकरच आरोपीला अटक करू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने अवघे आनंदवन हादरले आहे.