चंद्रपूर : क्रांतीभूमी चिमूर शहरातील इंदिरा नगर (बेघर वस्ती) येथे राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर त्याच वार्डात राहणाऱ्या दोन मुस्लिम समाजाच्या आरोपीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे जनमानसात संताप निर्माण झाला.

आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी संतप्त जमावाने करत पोलीस ठाण्याला घेराव केला. तसेच दगडफेक केल्याने सोमवारी रात्री चिमूरमध्ये तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यामधे एक होमगार्ड व अन्य काही जण जखमी झाले आहेत. यातील एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूरला हलवण्यात आले आहे. यावेळी जमावाने टायर व इतर साहित्याची जाळपोळ देखील केली.

चिमूर या तालुक्याच्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यानंतर पीडित मुलींच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रशीद रुस्तम शेख व नसीर वजीर शेख या दोघांना अटक केली. या दोन्ही अल्पवयीन मुली शहरातील बेघर वस्तीत राहणाऱ्या आहेत. पीडित मुलीचे आई-वडील रोजमजुरी करून परिवार चालवतात. पीडित दोन्ही मुलीचे घर एकमेकाशेजारी आहे. दोन्ही पीडित मुली मैत्रिणी आहेत तर त्याच वॉर्डात राहणारे आरोपी रशीद रुस्तम शेख (नडेवाला) यांनी ओळखीचा फायदा घेत खाऊ देण्याचे आमिष दाखवून घरी बोलावून दोन्ही अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

दुसऱ्या दिवशी दुसरा आरोपी नसीर वजीर शेख (गोलेवाला) यानेही खाऊचे आमिष दाखवून घरी बोलावून अत्याचार केला. हा प्रकार दोन्ही मुलीसोबत सप्टेंबर महिन्यापासून सुरु असल्याचे पीडितेच्या आईने पोलिसांना तक्रारीत सांगितले. पोलिस तक्रार होताच संतप्त जमाव पोलिस ठाण्यासमोर एकत्र आला. यावेळी आरोपी आमच्या ताब्यात द्या अशी मागणी संतप्त जमावाने केली. तसेच पोलिस ठाण्यासमोर सर्वांनी एकत्र येत संताप व्यक्त केला. चिमूर पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपीना अटक करून ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन चिमूर येथे दाखल झाले. दरम्यान यावेळी संतप्त जमावाने टायरची जाळपोळ केली. तसेच जोरदार निदर्शने केली. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यात होमगार्ड तसेच इतर काही जण जखमी झाले. यातील एक जखमी गंभीर आहे.