चंद्रपूर : आनंदवन येथील आरती दिगंबर चंद्रवंशी (२५) हत्या प्रकरणातील आरोपी समाधान माळी (३१) याने वरोरा पोलीस ठाण्यात बुटाच्या लेसने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृत आरोपी समाधान याने प्रेयसी आरती हिची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केला होता, अशीही माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत स्टेशन डायरी प्रमुख व पोलीस शिपाई अशा दोघांना निलंबित करण्यात आले आहे.
थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवन येथे वास्तव्यास असलेल्या अंध वडील व आईची मुलगी असलेल्या आरती चंद्रवंशी या मुलीची आरोपी समाधान माळी याने बुधवार २६ जून रोजी रात्री ८.३० वाजता धारदार चाकूने हत्या केली होती. आरोपी समाधान याला वरोरा पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती. २८ जून पासून आरोपी माळी वरोरा पोलिस ठाण्यात कोठडीत होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना प्रेमप्रकरणातून आरोपीने आरतीची हत्या केल्याचे समोर आले. मात्र हत्या करण्यापूर्वी आरोपी समाधान याने आरतीवर बलात्कार केला होता अशी माहिती तपासात उघडकीस आल्याने पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सांगितले. बलात्काराची घटना उघडकीस आली तेव्हापासून आरोपी डिप्रेशन मध्ये होता.
हेही वाचा…शिष्यवृत्तीला विद्यार्थी मुकल्यास महाविद्यालय जबाबदार, काय आहेत शासनाच्या सूचना
दरम्यान रविवार ३० जून रोजी सकाळी आरोपी पोलिस कोठडीत असताना तेथील संडास मध्ये प्रातविधीसाठी गेला होता. समदास मध्येच त्याने पायाच्या बुटाची लेस काढून गळफास लावून आत्महत्या केली. संडास मधून आरोपी बराच वेळ बाहेर आला नाही म्हणून पोलिस शिपायाने जावून बघितले असता त्याने गळफास लावलेला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला होता असे पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी सांगितले या वेळी दोन पोलिस शिपाई पोलिस कोठडी समोर होते. त्यातील एक पोलिस स्टेशन डायरी लिहीत होता तर एक जण संडासला गेला होता. या दोघांनाही निलंबित केल्याचे सुदर्शन यांनी सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता प्रकरण सीआयडी कडे सोपविण्यात येत असल्याचे सांगितले. न्यायालयाचे प्रक्रियेत सर्व सोपस्कार केले जात आहे अशीही माहिती सुदर्शन यांनी दिली. या प्रकरणात जो कुणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल अशीही माहिती सुदर्शन यांनी दिली. आत्महत्या करणारा आरोपी समाधान माळी हा जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील रहिवासी होता. त्याचा ह. मु. वरोरा येथे होता.या प्रकरणातील कारवाई पोलिस अधीक्षक मुंमक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती रीना जनबंधू, सहायक पोलिस अधीक्षक श्रीमती नायोमी साटम यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन वरोरा येथील पोलीस निरिक्षक अमोल काचोरे करीत आहे.