चंद्रपूर: बिल्डींग मटेरीअल सप्लायर याच्याकडे दोन लाख २० हजारांची लाच मागून, १ लाख १९ हजार ९०० रू. स्विकारले आणि उर्वरीत १ लाख रूपये देण्यासाठी तगादा लावला. या प्रकरणाची तक्रार लाचलुचप्रत प्रतिबंधक विभागाकडे करताच बल्लारपूरचे तहसीलदार अभय अर्जुन गायकवाड व तलाठी सचिन रघुनाथ पुकळे यांच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान तहसीलदार गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आले असून तलाठी सुटीवर असल्याने त्याचा शोध सुरू आहे.
बल्लारपुर तालुक्यातील मौजा कोठारी येथील तक्रारदार यांचा बिल्डींग मटेरिअल सप्लायर चा व्यवसाय आहे. त्यांची मौजा कवडजई येथे शेती असून २३ मार्च २०२५ रोजी २ ट्रक्टर व १ जे.सी.बी. च्या सहाय्याने शेतातील माती/मुरूम काढून शेतजमिन सपाटीकरणाचे काम सुरू होते. कवडजई साजाचे तलाठी सचिन पुकळे व बल्लारपूरचे तहसीलदार अभय गायकवाड यांनी तक्रारदार यांना माती/मुरूम काढण्याची परवानगी नसल्याने शेतातील २ ट्रक्टर व १ जे.सी.बी. जप्त न करण्याकरीता तसेच कोणतीही कारवाई न करण्याकरीता तहसीलदार यांचेकरीता २ लाख रूपये आणि तलाठी करीता २० हजार रूपये असे एकुण २ लाख २० हजार रूपये लाचेची मागणी केली. तसेच त्याच दिवशी तलाठी सचिन पुकळे व तहसीलदार गायकवाड यांनी तक्रारदाराकडून १ लाख १९ हजार ९०० रू. स्विकारले. मागणी केलेल्या रक्कमेपैकी उर्वरित १ लाख रू. देण्याकरीता तहसीलदार व तलाठी यांनी तक्रारदार यांचेकडे तगादा लावण्याने तक्रारदार यांनी त्यांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून २६ मार्च २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली.
या तक्रारीवरून प्रतिबंधक विभागाने पडताळणी कारवाईत तहसीलदार अभय गायकवाड व तलाठी पुकळे यांनी तडजोडीअंती ९० हजार रूपये तक्रारदार यांच्याकडे मागितले. तेव्हा तक्रारदार याने मंगळवार १ एप्रिल रोजी ९० हजार रूपये पाठविले. मात्र तहसीलदार अभय गायकवाड यांनी तक्रादाराकडून लाच रक्कम स्विकारण्यास नकार दिला. त्यावरून आज १ एप्रिल रोजी बल्लारपूर पोलीस ठाण्यात आरोपी लोकसेवक यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही केली. तसेच आरोपी तहसीलार अभय अर्जुन गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर तलाठी सचिन रघुनाथ पुकळे हे रजेवर असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले आहे. सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले व सहकाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.