चंद्रपूर – येथील भानापेठ वॉर्डात असलेल्या हिंदुस्थान स्टिल व्यापारी हबीब शेख यांच्याकडील १७ लाख रूपयाची रोख रक्कम घेऊन जाणार्या नोकरानेच त्या रक्कमेवर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना गुरूवार .२० मार्चला दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. व्यापारी हबीब शेख यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नोकर रफीक शेख याला अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, भानापेठ वॉर्डात हबीब शेख यांचे हिंदुस्थान स्टिलचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात काम करणारा नोकर रफीक शेख हा दुकानातील व्यवसायाचे पैसे १७ लाख रूपये रोख रक्कम घेऊन भानापेठ येथून मोपेड दुचाकीने घुटकाळा वार्डाकडे जात असतांना दुपारी ३ वाजताच्या सुमारास आंबेकर ले आऊट चौकात अज्ञात इसमांनी डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याचेजवळील रक्कमेची बॅग हिसकावून पळून गेले, अशी माहिती नोकराने दिल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी लगेच सर्वत्र तपास सुरू केला.
घटनास्थळ शेजारील सिसिटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. तसेच त्याचे मालक हबीब शेख, अधिनस्त नौकर चाकर व इतर सावदार यांना विचारपुस करण्यात आली परंतु संशयीतांचा कुठलाही सुगावा लागला नाही. पोलीसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवली असता तांत्रीक विश्लेषण व परीस्थीती जन्य पुराव्याचे आधारे नौकर रफीक शेख यांनेच सदरचा गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनी यातील नमुद रक्कम ही त्याचा भाऊ शफीक शेख रा. रहमतनगर चंद्रपूर यांचेकडे दिल्याचे कबूल केले व स्वतः आणलेली मिरची पावडर आपले अंगावर टाकून चोरी झाल्याचा बनाव रचल्याचे उघड झाले.
सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरु असुन आरोपीकडून संपुर्ण मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मूका सुदर्शन, अपर रिना जनबंधू, पोलीस उपअधिक्षक सुधाकर यादव यांचे मार्गदशनार्थ पोनि. प्रभावती टी. एकरके, पोउपनि. संदिप बच्छिरे, व डि. बी. पथकातील सर्व पोलीस अंमलदार हे करीत आहेत.