चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पुन्हा सक्रिय झाले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघाचे आमदार तयारीला लागले आहेत. उद्घाटन, भूमिपूजन, लोकार्पण, मेळावे, मोर्चा, आंदोलने, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार तथा अन्य विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. विधानसभा निवडणुकीला आजपासून तीन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. १ नोव्हेंबर रोजी दिवाळी असल्याने दिवाळीचे फटाके फुटण्यापूर्वीच निवडणुकीचे फटाके फुटणार आहेत.

हेही वाचा…नागपूर : आधीच रस्ते अरुंद, त्यात जड वाहने, शहर बसेसची वर्दळ; अंबाझरी परिसरात वाहतूक कोंडीचा कळस

साधारणत: सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेता चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रम्हपुरी, चिमूर, वरोरा व राजुरा या सहाही विधानसभा मतदारसंघाचे आमदार सक्रिय झाले आहेत. वडेट्टीवार ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली या त्यांच्या विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या तालुक्यांमध्ये उद्घाटन, भूमिपूजन, गुणवंतांचे सत्कार सोहळे घेऊन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मतदारांच्या भेटी घेत आहेत. आचारसंहितेपूर्वीच मतदारांना रसद पुरवण्याचे कामही सुरू झाले आहे. पालकमंत्री मुनगंटीवार बल्लारपूर मतदारसंघात सक्रिय झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर १५ दिवस मुंबई, दिल्लीत भाजपच्या चिंतन बैठकींना हजेरी लावल्यानंतर मुनगंटीवार यांनी बल्लारपुरात सभा घेऊन ‘टायगर अभी जिंदा है,’ असा इशारा विरोधकांना दिला. त्यांनी संपूर्ण बल्लारपूर मतदारसंघ पिंजून काढण्याची व्यूहरचना आखली आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा विधानसभा मतदारसंघात अधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. जिवती, कोरपना या अतिदुर्गम भागात आणि गोंडपिंपरी तालुक्यातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी जनसंपर्क वाढवण्यावर जोर दिला आहे. चंद्रपूर विधानसभेचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी सहा महिन्यांपूर्वीपासून ‘अम्मा टिफिन’, भूमिपूजन, उद्घाटन्, लोकार्पण, आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क सुरू केला आहे. चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनीही मतदारसंघात अधिकाधिक वेळ देणे सुरू केले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर वरोरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी आतापासूनच तयारीला लागल्या आहेत.

हेही वाचा…कुलगुरू चौधरींमागचे शुक्लकाष्ठ संपेना….आता पुन्हा नव्या चौकशीचा ससेमीरा…….

वडेट्टीवारांचा गावभेटीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद

विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत तत्काळ मार्गी लावल्या. वडेट्टीवार यांनी झिलबोडी (परसोडी), धामणगाव, तुलन्हानमेंढा, गायडोंगरी, परसोडी(तु.) या गावांना भेटी दिल्या. यादरम्यान गावांगावात सुरू असलेली विकासकामे आणि ‘विजयदूत’ या उपक्रमाबाबत गावकऱ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी त्यांच्यासमवेत तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, न.प. माजी बांधकाम सभापती विलास विखार, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, जिल्हा उपाध्यक्ष मोंटू पिलारे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur bjp congress representatives gear up for assembly elections started meeting people rsj 74 psg