चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर भाजपमध्ये सारं काही आलबेल नसल्याचे चित्र आहे.माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून प्रत्येक कार्यक्रमाचे स्वतंत्ररित्या दोनवेळा आयोजन केले जात आहे. याचेच पडसाद भाजपच्या स्थापनादिनीही उमटले. मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्याकडून भाजप स्थापनादिन दोन वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करण्यात आला.
भाजप शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात भाजप स्थापनादिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला आमदार मुनगंटीवार, डॉ. मंगेश गुलवाडे, राजेंद्र गांधी, प्रमोद कडू, आदी उपस्थित होते. दुसरीकडे, आमदार जोरगेवार यांनी कन्यका मंदिर सभागृहात भाजप स्थापनादिन कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस, ज्येष्ठ नेते रमेशचंद्र बागला, विजय राऊत, अशोक जिवतोडे, अजय जयस्वाल, आदी उपस्थित होते.दोन्ही कार्यक्रमांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘लाईव्ह’ भाषण दाखवण्यात आले.गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही नेते प्रत्येक कार्यक्रम स्वतंत्ररित्या दोनवेळा घेत आहेत. महाकाली यात्रेकरूंसाठी एसटी महामंडळाने पाच नवीन बसगाड्या उपलब्ध करून दिल्या. या दोन्ही नेत्यांनी या बसगाड्यांचे लोकार्पणही दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांत केले.
महाकाली यात्रा नियोजनासाठी मुनगंटीवार, जोरगेवार यांच्यासह मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, या तिन्ही नेत्यांनी स्वतंत्र बैठका घेतल्या. त्यापूर्वी पडोली येथील वाहतूक थांब्याचे लोकार्पणही चर्चेत राहिले. एवढेच नाही, तर सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांचे एकाच विश्रामगृहात या दोन्ही नेत्यांनी व त्यांच्या समर्थकांनी वेगवेगळे स्वागत केले. यावरून मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
‘नेता पक्षाचा चेहरा, तर कार्यकर्ता आत्मा’
नेता हा पक्षाचा चेहरा असतो, तर कार्यकर्ता हा आत्मा आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष केंद्र आणि राज्यात सत्तेत आहे, असे प्रतिपादन आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी केले. १९५२ मध्ये जनसंघाची स्थापना झाली. त्यानंतर १९८० च्या दशकात भाजपची स्थापना झाली. केवळ कार्यकर्त्यांच्या बळावर कधीकाळी दोन खासदार असलेला हा पक्ष केंद्र व राज्यात सत्तेत येईल, यावर कुणाचा विश्वास नव्हता. मात्र, आज केंद्रासोबतच महाराष्ट्र व अनेक राज्यांत सत्ता आहे. हे कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे फलित आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. यावेळी मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांचा सत्कारही करण्यात आला.
‘कार्यकर्त्यांचा सन्मान कृतज्ञतेचे खरे प्रतीक’
कार्यकर्त्यांची निष्ठा, समर्पण आणि निःस्वार्थ सेवेमुळेच आज भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. आज पक्षाच्या स्थापनादिनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान केवळ औपचारिकता नाही, तर कृतज्ञतेचे खरे प्रतीक आहे, असे प्रतिपादन आमदार जोरगेवार यांनी यावेळी केले. भाजप ही केवळ राजकीय संघटना नसून एक विचारधारा आहे. सत्ता असो वा नसो, कार्यकर्त्यांनी पक्षासाठी खांद्याला खांदा लावून काम केले आहे. त्यांचा समर्पणभाव खरोखर वंदनीय आहे, असेही ते म्हणाले. भाजप भवनासाठी एक एकर जागा देण्याची घोषणा जोरगेवार यांनी यावेळी केली. याप्रसंगी अहीर, शोभा फडणवीस यांचीही भाषणे झाली.