चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून महाकाली यात्रा परिसरात गायिका शहनाज अख्तर यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या मंचावर सत्कार स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांपासून तर महापालिका आयुक्तांपर्यंत सारेच अधिकारी अवतरल्याने ‘मुझे चढ गया भगवा रंग’ अशी टीका आता सर्वच स्तरातून होत आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा तथा श्री माता महाकाली महोत्सव ट्रस्टच्या वतीने महाकाली मंदिर यात्रा परिसरात गायिका शहनाज अख्तर यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम ११ एप्रिल रोजी आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाकाली यात्रेसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कारही आयोजित केला होता. जिल्हा, महापालिका व पोलीस प्रशासनातील अधिकारी राजकीय हेतूने आयोजित राजकीय पक्षांच्या कार्यक्रमाला जाणे शक्यतोवर टाळतात. मात्र येथे प्रशासनातील सर्वच मोठे अधिकारी सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावर हजर होते.

या अधिकारी वर्गात सत्कारमूर्ती जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल, तहसीलदार विजय पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खेवले, शहर अभियंता विजय बोरीकर, सिटी पोलीस स्टेशनच्या निरीक्षक प्रभावती एकुरके, रामनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आसिफ रजा, वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, वेकोलिचे क्षेत्रीय महाप्रबंधक, विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता व सहाय्यक अभियंता, एस.टी. महामंडळाच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता रवींद्र हजारे, प्रभारी उप-अभियंता आशीष भारती, शहर स्वच्छता निरीक्षक डॉ. अमोल शेळके, नगर रचनाकार राहुल भोयर, सहाय्यक नगर रचनाकार प्रतीक देवतळे, सुरक्षा अधिकारी राहुल पंचबुद्धे, सहाय्यक अभियंता शुभांगी सूर्यवंशी, नगर सचिव नरेंद्र बोबाटे उपस्थित होते.

तसेच यांत्रिकी विभाग प्रमुख रवींद्र कळंबे, पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता सोनुजी थुल, विद्युत विभागाच्या उपअभियंता प्रगती भुरे, सिस्टम मॅनेजर अमोल भुते, भांडारपाल सिद्दीकी शेख, झोन क्र. ३ चे सहाय्यक आयुक्त संतोष गर्गेलवार, आणि झोन क्र. १ चे सहाय्यक आयुक्त अक्षय गडलिंग, अतिक्रमण विभागाचे मनिष शुक्ला यांचा समावेश होता. अख्खे जिल्हा, महापालिका व पोलीस प्रशासन भाजपच्या मंचावर बघून सारेच चक्रावले. भरीस भर भाजपचे महाराज अशी ओळख असलेले मनिष महाराज देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या सर्व अधिकाऱ्यांचा यात्रेत उत्तम व्यवस्था केल्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाजपच्या मंचावर झाडून सारे अधिकारी हजर राहिल्याने इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावर आक्षेप नोंदविला आहे. अन्य पक्षानी अशा प्रकारे धार्मिक व राजकीय कार्यक्रमाचे आयोजन केले तर अधिकारी मंचावर येऊन सत्कार स्वीकारतील काय, असा थेट प्रश्नही केला आहे.