चंद्रपूर: चंद्रपूर हा धान उत्पादक जिल्हा आहे. खरीप हंगामात जिल्ह्याचे सर्वसाधारण लागवड क्षेत्र ४ लक्ष ५८ हजार हेक्टर असून यापैकी १ लक्ष ८८ हजार हेक्टरवर (३५ टक्के) भाताचे पीक घेतले जाते. सद्यस्थितीत जिल्ह्यात मुसळधार पाऊस असल्याने धानाच्या रोवणीने जोर पकडला आहे. अशातच जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी पदाचा कुठलाही अभिमान न बाळगता भर पावसात धानाच्या शेतात हजेरी लावून पायाने चिखल तुडवित यांत्रिकी आणि पारंपरिक पद्धतीने धानाची रोवणी केली. तसेच परिसरातील शेतकऱ्यांकडून रोवणीबद्दलची माहिती जाणून घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मूल तालुक्यातील चिखली येथील प्रमोद कळसकर यांच्या शेतात यांत्रिक पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मूलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व इतर अधिकारी प्रत्यक्ष बांधामध्ये उतरले. यावेळी त्यांनी स्वतः रोवणी यंत्र हाताळून तसेच पारंपरिक पद्धतीने भात रोवणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी यांत्रिकी पद्धतीने भाताची रोवणी कशी करतात याबद्दल तसेच यांत्रिक पद्धतीने तयार केलेले भात रोपाचे केक तयार करण्याची पद्धत जाणून घेतली.

हेही वाचा – “शरद पवार केवळ सात जागांच्या भरोशावर पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहताहेत,” सुधीर मुनगंटीवार यांची टीका

पारंपरिक पद्धतीने भात लागवड केली तर प्रति एकर चार ते साडेचार हजार रुपये रोवणीचा खर्च येतो, मात्र यांत्रिकी पद्धतीने रोवणी केली तर एका दिवसात दोन एकरात रोवणी करता येते. व एका एकराला जास्तीत जास्त एक हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे मजुरीची बचत होते आणि खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होते. भात रोवणी यंत्राची किंमत ४ लक्ष रुपये असून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर उपलब्ध आहे. यांत्रिकी पद्धतीने भाताची रोवणी केल्यास योग्य अंतरावर लागवड होते. त्यामुळे पिकास योग्य प्रमाणात हवा, सूर्यप्रकाश मिळतो. बियाणे कमी लागते व उत्पादनात वाढ होते.
यावेळी कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी व्यवहारे, मूलच्या तहसीलदार मृदुला मोरे, तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, गट विकास अधिकारी राठोड व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा – वर्धा : तिहेरी प्रेम प्रकरणातील तरुणीचाही अखेर मृत्यू, प्रेयसीच्या खोलीवर तरुणाला बघताच राग अनावर झाला आणि…

इतरही ठिकाणी भेटी

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी ग्रामपंचायत मारोडा येथील सोमनाथ ऍग्रो टुरिझम पर्यटन केंद्राला भेट देऊन पाहणी केली व येथील उपस्थितांच्या समस्या जाणून घेतल्या. सोबतच सोमनाथ येथील गोसदन प्रकल्प, मारोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, गोबर्धन प्रकल्पास भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली.

यावेळी संध्या गुरनुले, मारोडा येथील सरपंच व सदस्य, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप विभागीय अधिकारी, बांधकाम विभागाचे उप विभागीय अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur collector ceo planted paddy in the field in heavy rain rsj 74 ssb