चंद्रपूर : छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्व. शौर्य आणि बलिदानाची अजरामर कलाकृती असलेला छावा हा चित्रपट सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटांमुळे वादही उदभवले आहे. मात्र चंद्रपुरात हा चित्रपट दाखविण्यासाठी भाजपाचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्यात अक्षरश: स्पर्धा सुरू आहे. सर्वसामान्यांपर्यंत आणि सर्वसामान्यांना हा चित्रपट बघता यावा हा प्रमाणिक हेतू यामागे असला तरी या स्पर्धेमुळे कार्यकर्तेही सैरभैर झाले आहेत. सकाळ, दुपार व संध्याकाळ असे सर्वच शो बुक असल्यामुळे चित्रपट गृहाचे संचालक फायद्यात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिध्द लेखक शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवर आधारीत छत्रपती संभाजी राजे यांचे जीवनचरित्र असलेला छावा हा ऐतिहासिक चित्रपट महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे.हा सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात चित्रपट रसिकांची मोठी गर्दी आहे. या सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा चित्रपट लोकांपर्यत पोहचावा या उदात्त हेतूने तसेच समर्थकांना दाखवण्यासाठी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्यात एक प्रकारे स्पर्धाच सुरू झाली आहे.

बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार हे आपापल्या कार्यकर्त्यांसाठी मिराज चित्रपट गृहात खास शो आयोजित करून हा सिनेमा दाखवित आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ व संभ्रम निर्माण झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दोन्ही आमदारांमध्ये स्वत:ची लोकप्रियता आणि शक्ती दाखवण्याची स्पर्धा लागली आहे. मुनगंटीवार यांनी सर्वप्रथम भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन केले. भाजप पदाधिकाऱ्यांसाठी मुनगंटीवारांनी शोचे आयोजन केले आहे ही वार्ता भाजपाच्या वर्तुळात पसरताच आमदार जोरगेवार यांनीही त्यांच्या समर्थकांसाठी विशेष शो आयोजित करण्यास सुरूवात केली. आता ही स्पर्धा इतकी वाढली आहे की मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जमवाजमव करून विशेष शो आयोजित केले जात आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारणात गटबाजी आणि सत्ता प्रदर्शनाची चर्चा रंगली आहे.

या स्पर्धेमुळे भाजपाचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अवस्थाही कात्रित फसल्यासारखी झाली आहे. कोणत्या आमदाराच्या शोमध्ये जायचे आणि कोणत्या गटात राहायचे हे त्यांना ठरवता येत नाही. काही कार्यकर्त्यांना दोन्ही आमदारांच्या शोमध्ये उपस्थिती नोंदवावी लागत असल्याने त्यांना वेळ काढणे कठीण होत आहे. या चित्रपटामुळे राज्यात मराठा विरूध्द ब्राम्हण समाज असेही चित्र निर्माण झाले आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजीत इंद्रजीत सावंत यांना नागपुरातील मुख्यमंत्र्यांचे निकटस्थ प्रशांत कोरटकर यांनी शिवीगाळ केल्याने तणावपूर्ण वातावरण आहे.

चंद्रपुरतील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे विचार तळागाळात पोहचविणाऱ्यांनी कोरटकर यांना अटक करावी अशी मागणी लावून धरली आहे. अशातच आता या चित्रपटाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे वातावरण येथे निर्माण होताना दिसत आहे. या वादामुळे भाजपाचे अनेक कार्यकर्ते संतप्तही आहेत. हा चित्रपट ऐतिहासिक आणि प्रेरणादायी असल्याचे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. ते कोणी दाखवले यापेक्षा आपण त्यातून काय शिकतो हे महत्त्वाचे आहे. मात्र आमदारांमधील परस्पर स्पर्धेमुळे चित्रपटाचा मूळ उद्देश मागे पडू शकत नाही. ते म्हणतात की राजकीय स्पर्धेपेक्षा इतिहास आणि संस्कृतीबद्दल एकता दाखवणे अधिक महत्त्वाचे आहे. छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून हा चित्रपट सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी मागणीही होत आहे. केवळ भाजपाचे कार्यकर्तेच नाही तर सामाजिक संस्था, कार्यकर्ते, पत्रकार, विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच समाजातील विविध घटकांसाठीही या सिनेमाच्या शोचे आयोजन केले गेले आहे.