चंद्रपूर : पाटबंधारे विभागाकडून अधिकृत परवानगी न घेता अल्ट्राटेक सिमेंट कंपनी ४० लाख लिटर पाण्याचा दैनंदीन उपसा करित असल्याची तक्रार राजुराचे काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दिपक कपूर यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे, ड्रोन कॅमेराव्दारे केलेल्या चित्रिकरणात ही धक्कादायक बाब उघडकीस आल्याचा दावा आमदार धोटे यांनी केला आहे.

कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट, आवाळपूर युनिटद्वारे मोठ्या प्रमाणात चुनखडीचे उत्खनन केले जात आहे. त्यामुळे परिसरात मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये लगतच्या अंमलनाला धरणाचे लाभ क्षेत्रातील झिरपाईव्दारे लाखो लिटर पाणी जमा होते. अंमलनाला लाभ क्षेत्रात परिसरात जमा होणारे लाखो लिटर पाण्याचा अवैध उपसा अल्ट्राटेक सिमेंट कंपनी करित आहे. या लाभ क्षेत्रातील पाण्याचा उपसा करीत असताना पाटबंधारे विभागाकडून रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे. मात्र अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने कोणत्याही प्रकारची परवानगी पाटबंधारे विभागाकडून घेतली नाही.

हेही वाचा – चंद्रपुरात लवकरच ‘ई-बस’ धावणार!

हेही वाचा – मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समायोजन रखडले? मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला केराची टोपली

अनधिकृतपणे दररोज ४० लक्ष लिटर पाणी उपसा करीत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणाची तक्रार होताच पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थळी तपासणीसाठी गेले होते. मात्र कंपनीकडून त्यांची दिशाभूल करून मौकास्थळ पाहणी करण्यास मनाई केली. एकीकडे शेतकाऱ्यांच्या शेतीकरीता पाणी वापरास निर्बंध घातला जातो. मात्र परीसारतील मोठमोठ्या कंपन्या विभागाचे कोणतेही निर्बंध नसल्याने परीसरातील नागरिकांवर अन्याय होत आहे. दरम्यान गडचांदूर येथील विभागीय कार्यालयातील लिपिक १० जून रोजी वर्धा नदी व अंमलनालावरील मीटर कॅलीब्रेशन करण्याकरीता गेले असताना त्यांना माईन्समधून पाणी उचल करत असल्याची शंका आली. त्यामुळे त्यांनी कंपनीमधील युनिट हेडला चुनखडी खाण बघण्याची मागणी केली असता माईन्समध्ये पाणी उचल होत नसल्याचे तसेच माईन्स दाखविण्यास मनाई असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संबधित अधिकारी यांनी ड्रोन कॅमेराव्दारे माईन्सची शुटींग केली असता त्यात कंपनीकडून पाणी उचल करीत असल्याचे दृष्य सामोर आले. चंद्रपूर जिल्ह्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूर माईन्समधून अवैद्यरित्या बिगर सिंचन पाणी वापर करीत असल्याची चौकशी करून कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दिपक कपूर यांच्याकडे केली आहे.