चंद्रपूर: सलग दोन दिवस देशातील व जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद घेतल्या गेलेल्या चंद्रपूर शहरात पाच वर्षापूर्वी २०१९ मध्ये ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली होती. विशेष म्हणजे १९ एप्रिल २२४ मध्ये ४३.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले होते तर २१ एप्रिल २०२५ रोजी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेतल्या गेली. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून २१ ते २१ एप्रिल या चार दिवसाकरिता चंद्रपूर जिल्ह्यात एक दोन ठिकाणी उष्मा लाटेबद्दल सतर्कता वर्तवण्यात आलेली आहे. दरम्यान तीव्र उन्हामुळे शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. दुपारी बारा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संचारबंदी लागल्यागत चंद्रपूर शहराची स्थिती असते.

आशिया खंडातील सर्वात मोठे वीज केंद्र तथा औद्योगिक शहर अशी नोंद असलेल्या या जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल महिन्यात उष्णतेची लाट सुरू होते. गेल्या कित्येक वर्षापासून एप्रिल व मे या दोन महिन्यात उन्हाचा पारा चढता राहितो. पाच वर्षापूर्वी देखील एप्रिल महिन्यात सर्वाधिक ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली होती. विशेष म्हणते तेव्हा लोकसभा निवडणुकीची धामधुम होती. पाच वर्षापूर्वी २०१९ मध्ये एप्रिल महिन्यातच अकोला शहरात ४७.२, अमरावती ४६.८, वर्धा ४६, यवतमाळ ४५.५, नागपूर ४५.३, गोंदिया ४४.४ तर बुलढाणा शहरात ४४ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद घेतल्या गेली होती अशी माहिती अभ्यासक सुरेश चोपणे यांनी दिली.

उन्हाचा पारा आता चढताच राहणार आहे. चंद्रपूर शहरात मागील चार दिवसांपासून तर उष्णतेचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या वर आहे. रविवारी देशातील सर्वाधिक उष्ण शहर अशी नोंद झालेल्या चंद्रपूरात ४४.६ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद घेण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी लगेच उन्हाचा पारा एक अंशाने वाढला असून २१ एप्रिल रोजी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. तर ब्रम्हपुरी शहरात ४५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.

देशात आणि विदर्भात हे सर्वाधिक तापमान असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान २१ ते २४ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात उष्मालाटेच्या संबंधाने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.

उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्ण लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी गौडा यांनी केले आहे. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा, दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे, थेट येणाऱ्या सुर्यप्रकाशाला/उन्हाला अडविण्याकरिता घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा, उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टिव्ही, किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात याव, हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, उन्हात अतिकष्टाची कामे करू नये, दारु, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नये, उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये, लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे, बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी, उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी, चप्पल न घालता अनवाणी उन्हात चालू नये