चंद्रपूर : ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ असो की गडचिरोली, या दोन्ही ठिकाणी अल्पसंख्यांक समाजाचे लोक प्रतिनिधित्व करीत आहेत. ही परंपरा आता खऱ्या अर्थाने बदलण्याची वेळ आली आहे, असे म्हणत काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर व भाजप आमदार परिणय फुके यांनी कॉंग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचे आवाहन कुणबी महाधिवेशनात केले.
ब्रम्हपुरी येथे हे अधिवेशन झाले. वडेट्टीवार हे अल्पसंख्यांक समाजाचे प्रतिनिधित्व करतात हे येथे उल्लेखनीय. रविवारी ८ सप्टेंबर रोजी ब्रम्हपुरी येथे झालेल्या कार्यक्रमाला चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा वडेट्टीवार यांच्या काँग्रेस पक्षातील विरोधक प्रतिभा धानोरकर, भाजप आमदार परिणय फूके यांच्यासह कुणबी समाजातील नेते उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वडेट्टीवार यांचे नाव न घेता त्यांना ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून पराभूत करा, असे आवाहन केले.
हेही वाचा – गणरायांची विविध रूपे दर्शविणारे मेळघाटात संग्रहालय, सहा हजारावर…
काय म्हणाल्या धानोरकर?
काही वर्षे ब्रह्मपुरी आणि गडचिरोलीत बहुसंख्य समाजाचे प्रतिनिधित्व अल्पसंख्य समाजाचे लोक करीत आहेत, ही परंपरा बदलण्याची हीच खरी वेळ आहे. कुणबी समाज काही राजकारणी लोकांच्या भूलथापांना बळी पडतो. आगामी विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदला, असे आवाहन धानोरकर यांनी केले. वडेट्टीवार यांच्यावर त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी टीका केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आमदार फुके काय म्हणाले?
भाजप आमदार परीणय फुके यांनी देखील भाजपच्या पक्षश्रेष्ठींना या मतदारसंघातून कुणबी चेहऱ्याला तिकीट द्यावे यासाठी गळ घालणार असल्याचे म्हटले. ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाचे १ लाख २५ हजार मतदार आहेत. या मतदारसंघात २००५ नंतर कुणबी समाजाचा आमदार निवडून आलेला नाही. तेव्हा आगामी विधानसभेत कुणबी समाजाचा प्रतिनिधी निवडून पाठविण्याचे आवाहन अधिवेशनात वक्त्यांनी केले. पक्ष कोणताही असो. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पण उमेदवार हा कुणबी समाजाचा हवा असेही आमदार फुके म्हणाले. मी जे बोलतो ते करतो. मी कधीच खोट बोलत नाही, यावेळी ब्रम्हपुरी येथून कुणबी उमेदवार राहील असेही फुके म्हणाले.
हेही वाचा – वाघाची शिकार : तब्बल ११ वर्षांनंतर शिकाऱ्याला शिक्षा…!
वडेट्टीवार यांच्यापुढे आव्हान
खासदार धानोरकर व भाजप आमदार फुके यांनी कुणबी समाजाच्या व्यासपीठावरून वडेट्टीवार यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. त्यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसचा एक गट व भाजप यांनी युती केल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे. विशेष म्हणजे कुणबी समाजाचे या महाअधिवेशनाला काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनाही प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. मात्र स्थानिक राजकारण बघता त्यांनी या अधिवेशनापासून दूर राहणे पसंत केले.