चंद्रपूर: नायलॉन विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील ३४ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वांना १३ ते १५ जानेवारी असे तीन दिवस हद्दपार केले आहे. मांजा विक्री प्रकरणात हद्दपारीची ही संपूर्ण राज्यातील पहिलीच कारवाई आहे.
प्लास्टिक व इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याचा वापर पतंग उडविण्याच्या सणाच्या वेळी करतात. त्यामुळे पक्ष्यांना व मानवी जीवितास तीव्र ईजा होते. अशा धाग्यांवर शासनाने बंदी घातलेली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यायी पर्यावरण पुरक धाग्याच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात अधिसूचना निर्गमित करून तसेच अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यप्रणाली तयार करून चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस ठाणे स्तरावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच सदर नायलॉन मांजावर प्रतिबंध घालण्यासाठी विशेष पथक तयार करून धाडी घालून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अशा धाग्यांवर बंदी घालण्यात आली.
हेही वाचा – अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
सोमवार १३ जानेवारी २०२५ रोजी अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांनी पोलीस स्टेशन चंद्रपूर येथील १९ इसम, पोलीस स्टेशन रामनगर येथील ८ इसम, पोलीस स्टेशन घुग्घुस येथील २ इसम, पोलीस स्टेशन दुर्गापूर येथील ४ व पोलीस स्टेशन मुल येथील १ इसम अशा एकूण ३४ जणांवर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ (२) अन्वये १३ ते १५ जानेवारी पर्यंत ३ दिवसाकरीता चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे.
हेही वाचा – शेगावातील केसगळतीची रुग्णसंख्या १४९ वर, भयाची व्याप्ती वाढली
आगामी सण उत्सव अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. सदरची कारवाई ही राज्यातील पहिलीच कारवाई असून सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी केली.