चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर सोमवार व मंगळवार असे दोन दिवस दोन्ही गटांकडून जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिवसभर फोन करून सोबत येण्याचे निमंत्रण देण्यात आले. शेवटी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनुक्रमे राजेंद्र वैद्य व राजीव कक्कड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे पवार साहेबांना समर्थन असल्याचे संयुक्त पत्रपरिषद घेऊन जाहीर केले.
गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जिल्ह्यातील पदाधिकारी संभ्रमावस्थेत होते. सोमवार व मंगळवार असे दोन दिवस मुंबईपासून तर पुणे, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य तथा शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड व अन्य पदाधिकाऱ्यांना सातत्याने फोन येत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्रीपदाची शपथ घेतलेले धर्मरावबाबा आत्राम, सुनील तटकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत या, विदर्भात संधी देऊ, असे आश्वासन दिले.
दोन्ही गटांच्या नेत्यांकडून सातत्याने संपर्क होत होता. अशात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, शहर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष अभिनव देशपांडे, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, हिराचंद बोरकुटे यांनी संयुक्त पत्रपरिषद घेऊन सर्वजण शरद पवार यांंच्यासोबत असल्याचे जाहीर केले.
हेही वाचा – नागपूर: मराठा, कुणबी समाजातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची संधी
जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांतील सर्व तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, विविध आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष तथा अन्य सर्व पदाधिकारीदेखील शरद पवार यांच्यासोबत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष वैद्य यांनी पत्रपरिषदेत दिली.