चंद्रपूर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील वादग्रस्त नोकर भरतीत ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये शिपाईच्या ९७ पदांसाठी २९१ उत्तीर्ण परीक्षार्थीना सोमवार १३ ते १५ जानेवारी या कालावधीत मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्यातील पुणे, नाशिक, संभाजीनगर, जालना, नागपूर, अमरावती अशा ९ परीक्षा केंद्रावर ही ऑनलाईन परीक्षा झाली. मात्र या सर्व केंद्रपैकी चंद्रपूर मधील ९९ टक्के परीक्षार्थी मुलाखतीला बोलवले आहे .
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पदभरती अगदी पहिल्या पासूनच वादात सापडली आहे. शिपाई व लिपिक पदाला मंजुरी मिळाल्या पासून सुरू झालेला वाद ऑनलाईन परीक्षेच्या दिवसांपर्यंत सुरू होता. अखेर, सर्व अडथळे पार करीत शिपाई पदाच्या पात्र परिक्षार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. २९१ पात्र परीक्षार्थ्यांना मुलाखतीचे पत्र पाठविण्यात आले आहे. १३ ते १५ जानेवारी या कालावधीत मुलाखतीची प्रक्रिया पार पडणार आहे. लिपिक पदाची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
हेही वाचा : Chhagan Bhujbal : “आज हवा तुम्हारी हैं, कल का तुफान…” छगन भुजबळांचा इशारा नेमका कोणाला?
बँकेकडून लिपिक २६१ आणि शिपाई ९७ अशा ३५८ पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आयटीआय लि. कंपनीला पदभरतीचे कंत्राट देण्यात आले. या कंपनीने पुणे, नागपूर, अमरावती,चंद्रपूर, गोंदिया, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा एकूण नऊ या जिल्ह्यात या परीक्षेचे केंद्र ठेवले होते. त्यामुळे आधीच प्रशिक्षणार्थ्यांत संताप व्यक्त होत होता. परीक्षेच्या दिवशी ऑनलाईन परीक्षते गोंधळ उडाल्याने परीक्षार्थींचा संतापाचा उद्रेक झाला. शेवटी शिपाई पदाची पहिल्या दिवशीची परीक्षा रद्द केली होती. काही ठिकाणी तोडफोडीच्या घटनासुद्धा घडल्या. यानंतर संबंधित कंपनीने शिपाई पदासाठी २९ डिसेंबर रोजी शिपाई पदाच्या परीक्षा आटोपल्या.
९७ शिपाई पदासाठी राज्यभरातून १२ हजार २८० अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील ३ हजार ७८४ परिक्षार्थ्यांनी परीक्षा दिली. तर, ८ हजार ८९५ अर्जदार अनुपस्थित होते. आता परीक्षा दिलेल्या परिक्षार्थ्यांतून २९१ परीक्षार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले. सोमवार १३ ते १५ जानेवारी या काळात मुलाखतीचा कार्यक्रम बँकेने जाहीर केला आहे. यानंतर नियुक्ती दिली जाणार आहे. मात्र ज्या परीक्षार्थीना मुलाखतीला बोलावले आहे त्यात ९९ टक्के चंद्रपूरचे आहेत. त्यामुळे पुणे, नाशिक मधील परीक्षार्थी इतके ढब्बू व चंद्रपूरचे हुशार कसे असाही प्रस्न पडला आहे.
हेही वाचा : महाराष्ट्र केसरी महिला कुस्तीचा रंगणार फड, येणार नामवंत मल्ल
बँकेने लिपीकपदाच्या १६ जानेवारीपासून मुलाखती
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून लिपिक २६१ या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. सुमारे १८ हजार ८७६ अर्ज राज्यभरातून या पदासाठी करण्यात आले. मात्र, ११ हजार ४१६ अर्जदारांनी परीक्षेकडे पाठ फिरवली. केवळ ७ हजार ४५० परिक्षार्थ्यांनी परीक्षा दिली. या परिक्षार्थ्यांची पात्र यादी लावण्यात आलेली नाही. मात्र, त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम १६ ते २३ जानेवारी हा ठरविण्यात आला आहे. यामुळे लवकरच पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असे बोलले जात आहे.
भद्रावतीत संचालकांची बैठक
उद्यापासून शिपाई पदासाठी मुलाखती होत असताना भद्रावती येथील बँकेच्या एका संचालकाच्या घरी बँकेच्या सर्व संचालकांची बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्याच्या मुलाखतीसाठी व कोणत्या उमेदवाराची निवड मुलाखतीत करायची यासाठी ही बैठक असल्याचे सांगण्यात येत आहे.