चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ९७ शिपाई पदांसाठी ऑनलाइन परीक्षा शनिवारी झाली. तांत्रिक बिघाडामुळे ती रद्द करण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार यांनी या भरती प्रक्रियेत व परीक्षेत मोठा घोळ सुरू असल्याची तक्रार केली आहे. दिल्ली येथील आयटीआय लिमिटेड कंपनीचे ओडीएस प्रवीण सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तांत्रिक बिघाडाची माहिती घेतली. मात्र, समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने परीक्षार्थ्यांनी हा ‘हॅकिंग’चा प्रकार आहे, असा संशय व्यक्त केला. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करून देण्याची हमी देण्यात आली, त्यांच्यासाठीच हा सर्व प्रकार गेला गेला, असा आरोप परीक्षार्थ्यांकडून केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकरी भरती प्रक्रिया सुरू आहे. शनिवारी शिपाई पदासाठीची परीक्षा तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली, तर रविवारी लिपिक पदासाठीची परीक्षा झाली. मात्र, सदर परीक्षा विदर्भातील लगतच्या जिल्ह्यांमध्ये न घेता पुणे, नाशिक या दूरच्या जिल्ह्यांमध्ये घेतली गेली. त्यामुळे उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या भरती प्रक्रियेत मोठा आर्थिक व्यवहार म्हणजे प्रत्येक जागेसाठी ४० लाख रूपये घेतल्या गेल्याचा आरोप आमदार जोरगेवार यांनी केला आहे. प्रक्रियेबाबत अनेक उमेदवारांच्या मनात शंका आहेत. शनिवारी ऑनलाइन पेपर सोडवताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. प्रश्नाचे उत्तर लिहिल्यानंतर ते सेव्ह करताच लिहिलेले उत्तर बदलत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. याची दखल घेत अर्ध्या तासांनी पेपर रद्द करून परीक्षा दोन दिवस पुढे ढकलण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

हेही वाचा : Video : ताडोबातील ‘‘अजीम-ओ-शान शहंशाह” कोण..?

आमदार जोरगेवार यांनी वरिष्ठ अधिकारी आणि परीक्षा घेणाऱ्या दिल्लीतील आयटीआय लिमिटेड कंपनीचे ओडीएस प्रवीण सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तांत्रिक बिघाडाची माहिती जाणून घेतली. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे सांगत आमदार जोरगेवार यांनी शंका उपस्थित केली. ही परीक्षा स्थानिक केंद्रावरच घेण्यात यावी. पुन्हा परजिल्ह्यात केंद्र देऊन परीक्षार्थ्यांवर आर्थिक भुर्दंड लादू नये, अशा सूचना आमदार जोरगेवार यांनी केल्या. सदर कंपनी व्यवस्थापनानेही आता पुढील परीक्षा स्थानिक केंद्रावर घेण्याचे मान्य केले आहे.

हेही वाचा : नागपुरात खुनाच्या घटनाच नव्हे, देहव्यापारही वाढला…गल्लोगल्ली उभारलेल्या मसाज-स्पामध्ये…

सखोल चौकशीची मागणी

शनिवारी शिपाई पदासाठी झालेल्या परीक्षेतील तांत्रिक बिघाडाची तसेच रविवारी लिपिक पदासाठी झालेल्या परीक्षेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी परीक्षार्थ्यांनी केली आहे. शनिवारी अर्धा पेपर सोडवल्यानंतर परीक्षा रद्द केली गेली, तर रविवारीही परीक्षा केंद्रावर संशयास्पद हालचाली बघायला मिळाल्या. त्यामुळे या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी परीक्षार्थ्यांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur district bank online exam dispute students suspect hacking rsj 74 css