चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून लिपिक आणि शिपाई पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना रात्री उशिरा नियुक्तीपत्रे देण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयानंतर हा सर्व प्रकार बँकेत सुरू होता, असा आरोप भाजप ओबीसी सेलचे मनोज पोतराजे यांनी केला आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई व लिपिक पदाच्या ३५८ जागांची भरतीप्रक्रिया सुरू आहे. मागील आठवड्यात मुलाखती झाल्या. जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होती. न्यायालय आज महत्त्वाचा निर्णय देणार असल्याने सर्व पात्र उमेदवारांना आजच नियुक्तीपत्रे दिले जातील, अशी चर्चा सुरू होती. यामुळे आज दिवसभर बँकेत गर्दी होती. त्यानंतर रात्री नियुक्तीपत्रे वाटप सुरू करण्यात आले, असा आरोप मनोज पोतराजे यांनी केला.
संचालक मंडळाचे अधिकार काढून घेण्याचा न्यायालयाचा निर्णय
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक सहा महिन्यांत घ्यावी तसेच सध्या कार्यरत संचालक मंडळाचे अधिकार काढून घ्यावे, असा निर्णय आज न्यायालयाने दिला. त्यामुळे रात्री उशिरा नियुक्तीपत्रे वाटपाचा खटाटोप करण्यात आला, असा आरोप मनोज पोतराजे यांनी केला आहे. यासंदर्भात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा दूरध्वनी बंद होता.
एस.सी., एस.टी., ओबीसी व महिला आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
तत्पूर्वी, सोमवारी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरक्षण बचाव समितीच्या पदाधिकारांच्या शिष्टमंडळासह मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बँकेच्या ३५८ जागांच्या भरतीत एस.सी., एस.टी., ओबीसी व महिला आरक्षण लागू करावे, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात लवकरच आदेश काढण्याचे आश्वासन दिले. आपले सरकार आरक्षणविरोधी धोरण सहन करणार नसून लवकरच हा प्रश्न निकाली काढू, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले.
मनोज पोतराजे यांचे उपोषण सुरूच
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीत आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोत पोतराजे आमरण उपोषणावर बसले आहेत. प्रजासत्ताकदिनी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांनी त्यांची भेट घेतली. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. यावेळी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे यांच्यासह आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान, मनसेचे सचिन भोयर यांनी प्रजासत्ताकदिनी चंद्रपूर जिल्हा बँकेसमोर बनावट नोटांचा पाऊस पाडून अनोखे आंदोलन केले.