चंद्रपूर : वाळलेल्या लाल मिरचीला युरोपात चांगलीच मागणी आहे. शिवाय भावही योग्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरपना व राजुरा तालुक्यांतील शेतकऱ्यांची वाळलेली लाल मिरची आता युरोपात निर्यात केली जाणार आहे. युरोपियन मानांकनात जिल्ह्यातील बिबी येथील लाल मिरची पात्र ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोरपना आणि राजुरा तालुक्यांत प्रामुख्याने कापूस, सोयाबीन ही पिके घेतली जातात. त्यासोबतच मिरचीचेही उत्पादन होते. पारंपरिक पद्धतीने लागवड केल्या जाणाऱ्या मिरचीला फारशी मागणी नाही. भावही अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना फारसा आर्थिक लाभ होत नाही. मात्र, कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीने कोरपना व राजुरा तालुक्यातील मिरची उत्पादकांना आधुनिक पद्धतीने मिरची पिकाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखवला. विशेषत: युरोपियन मानकांनुसार मिरची पिकाचे उत्पादन घेण्याबाबत कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात धडे दिले.
यामुळे पहिल्यांदाच कोरपना तालुक्यात ८५० हेक्टर आणि राजुरा तालुक्यात ३०० एकरमध्ये मिरची पिकाची लागवड करण्यात आली. मिरची पिकाचे युरोपियन मानांकनानुसार संवर्धन करण्यात आले. कृषी तज्ज्ञांच्या क्षेत्रीय भेटीने मिरची पिकाच्या उत्पादन वाढीस मदत झाली.

कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या मार्गदर्शनात तालुक्यात हानिकारक रसायनांचा वापर कमी करून अवशेष मुक्त मिरची उत्पादनाचा प्रायोगिक प्रयोग राबवण्यात आला. पहिल्याच वर्षी राबवण्यात आलेल्या प्रयोगात सहभागी झालेल्या चार शेतकऱ्यांची मिरची युरोपियन बाजारपेठेतील कठोर गुणवत्तेच्या निकषात बंगळुरू येथे करण्यात आलेल्या परीक्षणात उत्तीर्ण ठरली आहे. या प्रयत्नांचे फलित म्हणून बिबी येथील स्वप्निल झुरमुरे, चंद्रकांत पिंपळकर व दिनकर डाहुले यांची मिरची उत्पादनाने युरोपियन बाजारपेठेतील कठोर गुणवत्तेच्या निकषांत यशस्वीरित्या प्रवेश मिळवला आहे. लवकरच चंद्रपर जिल्ह्यातील लाल मिरची जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

राजुरा व कोरपना तालुक्यातील लाल मिरची युरोपात विक्रीसाठी निर्यात केली जाणार आहे. जिल्ह्यात लाल मिरचीला फारसा भाव नाही, युरोपात मात्र चांगला भाव आहे. युरोपियन बाजारपेठेत चांगला भाव मिळणार असल्याने येथील शेतकरी आनंदित दिसून येत आहे. कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रयत्नांमुळे जागतिक बाजारपेठेत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना व राजुरा तालुक्यातील मिरची उत्पादक पोहचला. याची दखल जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी घेतली. कोरपना तालुक्यातील बिबी या गावचे मिरची उत्पादक स्वप्निल झुरमुरे व चंद्रकांत पिंपळकर यांचा सन्मान करण्यात आला.

कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या मार्गदर्शनामुळे आज आमची लाल मिरची युरोपात जात आहे. आतापर्यंत १८ क्विंटल विक्रीला गेली आहे. यामुळे आम्ही समाधानी आहोत. – स्वप्निल झुरमुरे, मिरची उत्पादक शेतकरी.