चंद्रपूर : भंडारा, नागपूर, चंद्रपूर तथा राज्यातील इतरही जिल्ह्यात बाजार समिती निवडणुकीत कॉग्रेस पक्षाने स्थानिक पातळीवर केलेल्या आघाडीत भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे.
या जिल्ह्यात खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भद्रावती बाजार समितीत तर राजुरा बाजार समितीत आमदार सुभाष धोटे यांनी कॉंग्रेस आघाडीत उमेदवारी दिली आहे. सर्वत्रच अशा आघाड्या झाल्या असतांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाजू मांडण्याची संधी न देता एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप कॉग्रेसचे कार्यमुक्त जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केला. या कारवाई प्रकरणी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे यांची प्रत्यक्ष भेट घेवून न्याय मागणार आहे.
हेही वाचा >>> तेंडुलकर दाम्पत्याने दिलेल्या वचनाची पूर्तता केली; ताडोबातील शाळकरी विद्यार्थ्यांना गणवेश, स्कूल बॅग व पुस्तकांची भेट
चंद्रपूर बाजार समितीत स्थानिक पातळीवर भाजपाची आघाडी केल्यानंतर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यासह विजयोत्सव साजरा करणारे कॉग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरूवारी कार्यमुक्त केले. हा माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासाठी जबर धक्का होता. दरम्यान आज देवतळे यांनी पत्रपरिषदेत प्रदेशाध्यक्षांची बाजू मांडण्याची संधी न देता एकतर्फी कारवाई केली असल्याचे सांगितले. मागील नऊ वर्षापासून जिल्हाध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून राज्यातील कॉग्रसचे एकमेव खासदार, तीन आमदार, दोन विधान परिषद आमदार तथा जिल्हा परिषदेत कॉग्रेसचे सर्वाधिक सदस्य व आता कॉग्रेसच्या सात बाजार समित्या, ११६ सदस्य निवडून आणले. अशा स्थितीत कॉग्रेसने पाठ थोपटण्याऐवजी केलेली कारवाई योग्य नाही असेही देवतळे म्हणाले.