लोकसत्ता टीम

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा हा अनेक व्यावसायिक खनिजांनी समृध्द आहे. आता मौल्यवान धातूसुद्धा या जिल्ह्यात आढळल्याने चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देशात उंचावले आहे. जिल्ह्यातील सावली तालुक्यात क्रोमियम, प्लाटीनम आणि अल्प प्रमाणात सोने आढळल्याची माहिती भूशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.

सावली-पाथरी नावाने ओळखला जाणारा ब्लॉकला ( CL-MH-04) सर्वेक्षण करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ माईन तर्फे मान्यता देण्यात आली आणि डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत सर्वेक्षण करण्यात आले. त्यातंर्गत १६० वर्ग कि.मी. येवढ्या भूभागाचे G-4 पद्धतीचे टोपोग्राफीकल सर्वेक्षण करायचे होते. हे सर्वेक्षण MECL ला देण्यात आले. यात केवळ जमिनीवरील खडक आणि मातीचे नमुने गोळा केले असून ते नागपूर आणि कानपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. दुर्दैवाची बाब अशी की, या परिसरात जंगल आणि वन्यजीव असल्याने सर्वेक्षण चमूला पूर्ण भागाचे नमुने गोळा करता आले नाही. व्यावसायिक खाणी सुरू करायच्या असतील तर पुढे भूगर्भात बोअरहोल पद्धतीने सर्व भागात सर्वेक्षण केले जाणे महत्वाचे असल्याचे चमूने सांगितले. कारण धातूंचे मोठे साठे भूगर्भात जास्त असण्याची शक्यता चोपणे यांनी वर्तविली.

मिनरल एस्कप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे प्राथमिक सविस्तर अहवाल प्रसिद्ध करून शासनाला २०१८ मध्ये सादर करण्यात आला. प्रा. सुरेश चोपणे यांनी सुद्धा २१ एप्रिल २०२५ रोजी सावली तालुक्यातील धातू आढळणाऱ्या गावांना भेटी दिल्या. भौगोलिकदृष्ट्या सावली-पाथरी भूभाग हा बस्तर क्रेटोनचा भूभाग असून इथे ३०० कोटी वर्षादरम्यानाचे आर्कियन काळातील आणि १५० कोटी वर्षापूर्वीच्या प्रोटेरोझोईक काळातील खडक आहेत आणि याच खडकात मौल्यवान असे प्लाटीनम , क्रोमियम, सोने आणि इतर अनेक धातू आढळले आहेत. ज्यात पल्लाडीयम, इरीडीयम , रोडियम, रुथेनियम, ओस्मियम, सोने या धातूंचे अंश मिळाले आहेत. सर्वाधिक ( ९५० ppb )प्रमाण प्लाटीनम आणि क्रोमियमचे आढळले. सोने आणि इतर धातूंचे प्रमाण कमी आढळले. चंद्रपूरसाठी महत्वाची बाब म्हणजे प्लाटीनम आणि क्रोमियम चे साठे देशात चंद्रपूर वगळता कुठेच सापडले नाहीत. परंतु पुढील सविस्तर सर्वेक्षणात चंद्रपूर जिल्ह्यात आढळण्याची शक्यता भूशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.

देशात महत्वाचे मानले जाणारे मौल्यवान धातू केवळ चंद्रपूर जिल्ह्यात आढळल्याने जिल्ह्याच्या विकासाठी शासन, प्रशासनाने प्रयत्न करावे. भविष्यात लवकरात लवकर भूगर्भीय सर्वेक्षण होण्यासाठी लोकांनी, लोकप्रतिनिधी आणि मंत्री यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती प्रा. सुरेश चोपणे यांनी केली आहे.