नागपूर : पर्यटक वाहनातून जंगलात व्याघ्रदर्शन घेताना वाघाची ती भीती वाटत नाही, पण वाघ जंगलात दर्शन न देता तुम्ही आम्ही जात असलेल्या रस्त्यावर अचानक तुमच्या पुढ्यात येऊन थांबला तर…? रेणुका मातेच्या दर्शनासाठी जात असलेल्या सावली येथील प्रज्ञा चिंतलवर, शैलजा चिमडयालवार, ममता ताटकोंडावार, सरिता राईचंवार, वाहनचालक गणेश येलचलवार यांच्या पुढ्यात अचानक वाघ येऊन उभा राहिला. तब्बल दहा मिनिटे हा वाघ रस्त्यावरच होता. त्यामुळे ही दहा मिनिटे अक्षरशः जीव मुठीत धरून काढली.
या चारही बल्लारपूरवरून सकाळी माहूरला देवीच्या दर्शनासाठी जाण्यास निघाल्या. सकाळी दहा वाजताच्या सुमारास जुणोना-बल्लारपूर मार्गावर अचानक त्यांच्या वाहनासमोर वाघ आला. त्यांना सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण क्षणभरातच त्यांना तो वाघ असल्याचे लक्षात आले. त्या चारचाकी बंद वाहनात असल्या तरीही जंगलव्यतिरिक्त असा रस्त्यावर वाघ आल्याने कुणालाही भीती वाटेलच. एकीकडे यांचे वाहन तर दुसऱ्या बाजूला अनेक दुचाकी वाहनचालक होते. त्यामुळे वाघाने त्याचा रस्ता बदलला असता तर दुचाकी वाहनचालकांना भीती होती. त्या सर्वांनी दूर अंतरावर त्यांची वाहने थांबवली होती. पण वाघ मात्र राजाच्या थाटातच तब्बल दहा मिनिटे त्या रस्त्यावर चालत होता. त्यामुळे दोन्हीकडची वाहतूक खोळंबली होती. कारण वाघाला अव्हेरून समोर जाण्याची हिम्मत कुणातच नव्हती. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोठ्या संख्येने वाघ आहेत. मात्र, तेवढ्याच संख्येने किंबहुना त्यापेक्षाही जास्त वाघ या व्याघ्रप्रकल्पाबाहेर आहेत. त्यामुळे लगतच्या रस्त्यावर नेहमीच लोकांना व्याघ्रदर्शन होत असते.
हेही वाचा – बुलढाणा : नायलॉन मांजामुळे वीज पुरवठा खंडित; विद्युत तारा तुटल्या, १५ ते २० मीटर जळाले…
चंद्रपूर : रेणुका मातेच्या दर्शनासाठी जात असलेल्या सावली येथील भाविकांच्या पुढ्यात अचानक वाघ येऊन उभा राहिला. तब्बल दहा मिनिटे हा वाघ रस्त्यावरच होता. सकाळी दहा वाजताच्या सुमारास जुणोना-बल्लारपूर मार्गावर अचानक त्यांच्या वाहनासमोर वाघ आला. pic.twitter.com/eqtiqRlp3n
— LoksattaLive (@LoksattaLive) January 15, 2025
जुनोनाच्या जंगलात देखील मोठ्या संख्येने वाघ आहेत. अलीकडेच या क्षेत्रात देखील पर्यटकांसाठी सफारी सुरू करण्यात आली आहे. या क्षेत्रातील सफारीचे वैशिष्ट्य म्हणजे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा आणि बफर अशा दोन्ही क्षेत्राचा लाभ पर्यटकांना घेता येतो. या क्षेत्रात सफारीसाठी १८ पर्यटक वाहने उपलब्ध आहेत. सकाळी सहा पर्यटक वाहने, सायंकाळी सहा पर्यटक वाहने आणि रात्री सहा पर्यटक वाहने पर्यटनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, बरेचदा याठिकाणी बाहेरसुद्धा वाघ पाहायला मिळतात आणि ते नागरिकांसाठी धोक्याचे आहे. अलीकडेच ताडोबात अतिरिक्त व्याघ्रसंख्येवर नियंत्रण कसे ठेवायचे यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावरील परिषद पार पडली.