चंद्रपूर : जंगलव्याप्त चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्रातील ७० टक्के हत्तीरोगाचे रुग्ण आहेत. भातशेती असलेल्या ब्रम्हपुरी, सावली यांसारख्या तालुक्यांत रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. सर्वेक्षणानुसार चंद्रपूर जिल्ह्यात २०२४ मध्ये ९ हजार ३२१ हत्तीरोग रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, हत्तीरोग निर्मूलनासाठी सामुदायिक औषध अभियान सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटरे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत आरोग्य अधिकारी डॉ. कटरे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात हत्तीरोग निर्मूलनासाठी २०१९ पासून अभियान सुरू आहे. या अभियानात गोळ्यांचे वितरण केले जात आहे. आरोग्य संघटनेने केवळ अतिसंवेदनशील जिल्ह्यांनाच गोळी उपलब्ध करून दिली आहे. जगातील सर्वात सामान्य हत्तीरोग ‘वुचेरिया बॅनक्रॉफ्टी’ आणि ‘ब्रुझिया मलई’ या जंतांमुळे होतो. हा रोग संक्रमित ‘क्युलेक्स’ डासाच्या चाव्याद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. त्याची लक्षणे दिसायला ५ ते ७ वर्षे लागतात. २०२३ मध्ये ‘मायक्रोफिलेरियासिस’बाधित रुग्णांची संख्या १६१ होती, जी २०२४ मध्ये ९० पर्यंत कमी आहे. हत्तीरोगाचे रुग्ण २०२३ मध्ये १० हजार ४२६ होते, जे २०२४ मध्ये ९ हजार ३२१ आहे.
दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या औषध मोहिमेमुळे हत्तीरोगाच्या नवीन संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा आरोग्य अधिकारी डॉ. कटरे यांनी केला. सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येणार आहे. १० फेब्रुवारीला या मोहिमेचा शुभारंभ जि.प. उच्च प्राथमिक शाळा, अजयपूर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कटरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावर्षी जिल्ह्यातील चंद्रपूर ग्रामीण, भद्रावती, राजुरा, पोंभुर्णा, गोंडपिपरी, मूल, सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी आणि चिमूर या तालुक्यांमध्ये १० ते २० फेब्रुवारीदरम्यान घरोघरी जाऊन नागरिकांना गोळ्या दिल्या जाणार असल्याचे डॉ. कटरे यांनी सांगितले. २१ आणि २२ फेब्रुवारीला प्रत्येक गावात एका बूथ अंतर्गत एकूण १२५३ बूथ असतील. जे घरी गोळ्या घेऊ शकत नाहीत, ते येथे येऊन गोळ्या घेऊ शकतात. या मोहिमेत एकूण ४ उपजिल्हा रुग्णालये, ५ ग्रामीण रुग्णालये आणि १० तहसीलमधील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. एकूण १०३० गावे आणि ९२ वाड्यांमधील १२ लाख ५४ हजार ५१० लोकसंख्येपैकी ११ लाख ९४ हजार ३५७ पात्र लोकसंख्येला गोळ्या देण्यात येणार आहेत. यासाठी २९२० मनुष्यबळ आहे. त्याच पथकावर देखरेख ठेवण्यासाठी ३१५ पर्यवेक्षकांना जबाबदारी देण्यात आली आहे.
ब्रह्मपुरीत सर्वाधिक रुग्ण
जिल्ह्यात ब्रह्मपुरीमध्ये हत्तीरोगाचे सर्वाधिक १५९७ रुग्ण आहेत. याशिवाय नागभीडमध्ये १०७१, सावली १०३४, चिमूर ९६७, सिंदेवाही ७७९, वरोरा ५७३, भद्रावती ५५१, मूल ४८७, गोंडपिपूर ३९, राजुरा ३९, पोंभूर्णा ३०८, बल्लारपूर २३३, चंद्रपूर महापालिका क्षेत्रात ३८४, कोरपना २१८, जिवती १८, असे एकूण ९३२१ हत्तीरोगाचे रुग्ण आढळून आले आहेत.