चंद्रपूर : अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदारसंघातून बंडखोरी करीत भाजप उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांना आवाहन देणारे अपक्ष उमेदवार ब्रिजभूषण पाझारे यांच्यासह वरोरा मतदारसंघातून प्रहार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले माजी नगराध्यक्ष अहतेशाम अली, वसंत वारजूकर व राजू गायकवाड या चौघांची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या चौघांचेही सहा वर्षासाठी निलंबन करण्यात आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभरातील ४० बंडखोर नेत्यांची भाजपातून हकालपट्टी केली आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून पाझारे, अहतेशाम अली, वारजूकर व गायकवाड यांचा समावेश आहे. पाझारे हे भाजपाचे महामंत्री होते. चंद्रपूरातून विधानसभेसाठी त्यांचेच नाव आघाडीवर होते. मात्र शेवटच्या क्षणी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजपा प्रवेश झाला व चंद्रपुरातून उमेदवारी दिली गेली. त्यामुळे पाझारे यांनी जोरगेवार यांना आवाहन देत अपक्ष नामांकन दाखल केले. नामांकन दाखल करण्यापूर्वी पाझारे यांनी भाजपाचे महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्याकडे राजीनामा सोपविला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतरच पक्षाने त्यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे.

हेही वाचा…राहुल गांधींची दीक्षाभूमीला भेट, अभ्यागत पुस्तिकेत लिहिला ‘हा’ संदेश… त्याची सर्वत्र चर्चा

विशेष म्हणजे पाझारे मागील पंधरा वर्षापासून सातत्याने विधानसभा निवडणुकीची तयारी करित आहेत. मात्र दरवर्षी त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. शेवटी त्यांनी बंडखोरी केली असता पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. वरोरा येथे माजी नगराध्यक्ष अहतेशाम अली प्रहार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. अली यांचे पक्ष विरोधी बंड बघता त्यांनाही बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. ब्रम्हपुरी मतदार संघातून वसंत वारजूकर यांनीही नामांकन दाखल केले होते. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. मात्र तरीही त्यांना पक्षातून बाहेर करित सहा वर्षासाठी निलंबित केले आहे. तर राजू गायकवाड यांचीही हकालपट्टी केली आहे. दरम्यान पक्षासाठी ३० वर्षापेक्षा अधिक सेवा करून रक्ताचे पाणी करणाऱ्या ब्रिजभूषण पाझारे सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची तसेच वसंत वारजूकर, माजी नगराध्यक्ष अहतेशाम अली व राजू गायकवाड या चौघांची पक्षातून हकालपट्टी करित सहा वर्षासाठी निलंबित केल्याने भाजपाचा प्रामाणिक कार्यकर्ता अस्वस्थ आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्म आहे मात्र पक्षासाठी झिजणाऱ्या अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांला अशा पध्दतीने बाहेरचा रस्ता दाखविल्याने प्रामाणिकपणाची हिच ती पावती का असाही प्रश्न भाजपाच्या स्थानिक नेत्यांना पाझारे समर्थक विचारत आहेत.