चंद्रपूर : सकाळी शेतात काम करीत असताना वाघाच्या बछड्याशी शेतकऱ्याचा अचानक सामना झाला. बछड्याने शेतकऱ्यावर हल्ला केला.  त्याला प्रत्युत्तर म्हणून शेतकऱ्याने हल्ला परतावून लावला. काही वेळ दोघांमध्ये झुंज झाली, परंतु शेतकरी भारी पडल्याने वाघाच्या बछड्याने पळ काढला. शेतकरी आणि बछड्यांमध्ये झालेला हा थरार ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगाव जानी शेतशिवारात आज रविवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडला. या घटनेमध्ये शेतकरी गोवर्धन डांगे हे जखमी झाले. त्यांच्यावर ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ताडोबा अभयारण्य असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे कुठेही, केव्हाही दर्शन होते. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, शेतमजुरांना वाघ शेत शिवार, गावाशेजारी सहज बघायला मिळते. चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे दर्शन इतके शक्य झाले आहे, त्यामुळे शेतकरी शेतमजुरांना शेतावर जाताना काळजीनेच जावे लागत आहे. आज रविवारी ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगाव ज्यांनी येथील ४२ वर्षीय गोवर्धन डांगे गावापासून जवळ असलेल्या स्वतःचे शेतामध्ये सकाळी सव्वासात वाजता गेले होतें डांगे यांनी शेता मध्ये उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे आणि धानाला दिवस रात्र पंपाद्वारे पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांना शेतावर जाणे गरजेचे आहे. सकाळी शेतावरगेले आणि काम करू लागले.

शेतासभोवती दूरवर जंगल नाही. तरीही अचानक एक वाघाचा बछडा शेतात येऊन धडकला. काम करीत असलेल्या डांगे यांच्या समोर तो अचानक पुढे आल्याने त्यांना धडकी भरली. वाघ मोठा असो की छोटा तो वाघ असते. त्या बछड्याने क्षणाचाही विलंब न करता थेट शेतकऱ्यावर हल्ला केला.  तेवढ्याच तत्परतेने बछड्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांने हल्ला परतावून लावला. शिकारी वृत्ती अंगात असलेल्या बछड्याने वारंवार त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात शीताफिने सदर शेतकऱ्यांनी हल्ले परतवून लावले. काही वेळ त्याच्याशी झुंज देऊन त्याचा हल्ला परतावत शेतकरी भारी पडला. आणि बछड्याला पळून जाण्याशिवाय मार्ग उरला नाही. तो पळून गेला. मात्र यामध्ये शेतकरी जखमी झाला. पुन्हा पुन्हा बछडा परतून येईल त्यामुळे भयभीत झालेल्या शेतकरी लगतच्या विहिरीत उतरला तेथूनच त्याने मोठ्या मुलाला फोनवरून माहिती दिली.

मोठा मुलगा आणि गावातील शेकडो नागरिक शेत शिवारात दाखल झाले. वडील रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झालेल्या आहेत. त्यांनी थराराची आपबीती कुटुंबियांना आणि नागरिकांना सांगितली. त्यानंतर त्याला लगेच ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. शेतकऱ्यांने झुंज केल्यामुळेच वाघाला पळून जावे लागले नाही तर पुन्हा एका शेतकऱ्याला जीवापासून मुकावे लागले असते.  तपाड परिसरात काही दिवसांपासून वाघ व बछड्यांचे दर्शन होत आहे. त्यापैकीच एखादा बछडा नांदगाव जानी शिवारात आला असावा असा संशय शेतकरी वर्तवित आहेत. ताडोबा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघाला सहज पाहण्यासाठी अभयारण्यात जाण्याची गरज नाही तर शेत शिवारात गावालगत कुठेही वाघाचे दर्शन हमखास घेता येते. मात्र शेतकरी शेतमजूर यांना कामावर जाताना धडकीच भरते. शेतशिवारात भटकंती करणाऱ्या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

Story img Loader