चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील सर्वात मोठी कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माढेळी येथील पारस जिनिंगमध्ये खरेदी केलेल्या कापसाला मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आग लागली. यात सुमारे १३०० क्विंटल कापूस (किमंत ९१ लाख) जळाल्याचा अंदाज जिनिंग मालक प्रकाशचंद मुथा यांनी वर्तवला आहे.

पारस जिनिंगमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कापूस ठेवण्यात आला होता. दोन दिवसांत जिंनिंग होणार होते. याच साठवलेल्या कापसातून अचानक आगीचा भडका उडाल्याचे जिनिंगमधील कामगारांना दिसले. त्यांनी लगेच ही माहिती मालकांना दिली. जिनिंगमधील पाण्याने आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. काही वेळाने नगर परिषद व जिएमआर कंपनीच्या फायर बिग्रेडच्या गाड्या आल्या. अखेर काही वेळाने आग आटोक्यात आली.

कापूस उचलणाऱ्या जेसीबी यंत्राच्या लोखंडी बकेट व सिमेंट फ्लोरिंगमध्ये झालेल्या घर्षनातून ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीलगत असलेल्या कापूस गाठी त्वरित उचलण्यात आल्याने मोठे नुकसान टळले.

Story img Loader