चंद्रपूर : स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत असतानाच जिल्ह्यातील पाच युवकांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये बुडून मृत्यू झाला. भद्रावती येथील रितेश नथ्थू वानखडे (१८), आदर्श देवानंद नरवाडे (२०), रोहन डोंगरे, अविनाश पचारे, मंथन चिंचोलकर असे पाच मित्र सहज विरंगुळा म्हणून जुनाड येथे पोहोचले. वर्धा नदीच्या पुलावर बसले असताना संथ वाहणारी नदी बघून दोघांना नदीपात्रात उतरण्याचा मोह झाला. नदीत उतरले आणि पोहत असताना रितेश नथ्थु वानखडे, आदर्श देवानंद नरवाडे हे दोघे वाहून गेले. त्या दोघांचाही मृत्यू झाला.
चंद्रपूर येथील रहिवासी असलेले प्रविण सोमलकर (३६) व दिलीप कोसुरकर (४०) रा नायगाव असे आठ मित्र वणी तालुक्यातील नायगाव येथील वर्धा नदी परिसरात फिरायला गेले होते. वर्धा नदी पात्रात उतरले असता वाहून गेले. या दोघांचाही मृत्यू झाला. चंद्रपूर शहराजवळील दाताला येथील काही युवक अमलनाला धरणाजवळ फिरण्यासाठी आले होते, दुपारी दोन वाजताच्या सुमारास शुभम शंकर चिंचोळकर (३२) या युवकाने डॅमच्या वेस्ट वेअर पाण्यात उडी मारली. मात्र शुभमला खोलाचा अंदाज आला नसल्याने तो पाण्यात बुडाला. त्याचाही मृत्यू झाला.