चंद्रपूर : मुसळधार पावसाने पुन्हा एकदा चंद्रपूरला चांगलेच झोडपले. त्यामुळे एकाच आठवड्यात संपूर्ण चंद्रपूर सलग दुसऱ्यांदा जलमय झाले.शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर सर्वदूर पाणीच पाणी साचले होते. नाले सफाई योग्य पद्धतीने न झाल्याने चंद्रपूर शहरावर ही परिस्थिती ओढवली आहे.
मंगळवार १८ जुलै रोजी शहरात २४२ मिमी पाऊस पडल्याने अख्खे चंद्रपूर शहर पाण्यात बुडले होते. तेव्हा हजारो घरात तथा मुख्य मार्गावरील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले.त्यानंतर शुक्रवार, २१ जुलै रोजी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. गांधी चौक ते जयंत टॉकिज, कस्तुरबा मार्ग, सिटी शाळा, गिरनार चौक, नागपूर रोड, वाहतूक पोलीस शाखा तथा शहरातील खोलगट भागात सर्वत्र पाणी साचले. शास्त्रीनगरचा मच्छी नाला तुडुंब भरून वाहत होता, या नाल्याचे पाणी अनेकांच्या घरात शिरले.शुक्रवारीही जवळपास ८० मिमी पाऊस चंद्रपूर शहरात झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. या पावसामुळे पुन्हा एकदा चंद्रपूर महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे.