नागपूर : तीन गावकऱ्यांचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात चंद्रपूर वनविभागाला यश आले असून या वाघाची रवानगी गोरेवाडा येथे करण्यात येणार आहे. उत्तर ब्रम्हपूरी वनक्षेत्रातील चिचखेडा बिटात दुपारी साडेबाराच्या सुमारास ‘टी-३’ वाघाला जेरबंद करण्यात आले. या वाघाला जेरबंद करण्यात आल्याने परिसरातील गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

ब्रम्हपूरी नवविभागअंतर्गत नवेगाव/आवळगाव उपक्षेत्र परिसरात ‘टी-३’ वाघाचे वास्तव्य होते. या वाघाकडून परिसरात सातत्याने गावकऱ्यांवर, जनावरांवर हल्ले होत होते. त्यामुळे मानवी जिवितास धोकादायक ठरलेल्या या वाघाला जेरबंद करण्याची परवानगी ब्रम्हपूरी उपवनसंरक्षक व प्रादेशिक मुख्य उपवनसंरक्षक यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास राव यांच्याकडे केली. या परिसरात या वाघाने घातलेला धुमाकूळ लक्षात घेता आणि मानव-वन्यजीव संघर्षाची परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे पाहून मुख्य वन्यजीव रक्षकांनी त्याला जेरबंद करण्याची परवानगी दिली. या वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत तीन व्यक्ती मृत्युमुखी पडले आहेत. तर एकजण जखमी झाला आहे. तसेच पशुधन हानी देखील झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांकडून देखील वाघाच्या जिवितास होणारा धोका लक्षात घेता, त्याला जेरबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

चंद्रपूर वनवृत्तांतर्गत ब्रम्हपूरी वनविभागाचे अधिनस्ट असलेल्या उत्तर ब्रम्हपूरी, दक्षिण ब्रम्हपूरी वनपरिक्षेत्रात ‘टी-३’ या वाघाचा वावर होता. त्यामुळे केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार या वाघाला बेशुद्ध करुन जेरबंद करण्याची परवानगी देण्यात आली. तसेच ही प्रक्रिया करताना वाघाला इजा होऊ नये, असेही मुख्य वन्यजीव रक्षकांनी सांगितले. ३० एप्रिलपर्यंत ही परवानगी होती. मात्र, त्याआधीच वनखात्याच्या चमुने या वाघाला जेरबंद केले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी बेशुद्धीकरणाच्या बंदुकीत औषध भरले. तर नेमबाज अजय मराठे यांनी वाघाला बेशुद्ध करण्यासाठी निशाणा साधला. उत्तर ब्रम्हपूरी वनक्षेत्रातील चिचखेडा बिटातील कक्ष क्र. १५२ मध्ये वाघाला बेशुद्ध करण्यात आले. अंदाजे १५ वर्षे वयाचा हा वाघ होता. दरम्यान या वाघाची तपासणी करुन त्याला नागपूर येथील गोरेवाडा येथील वन्यजीव उपचार व बचाव केंद्रात स्थलांतरित करण्यात येणार आहे.