चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाने २०२४-२५ व पुढे या शैक्षणिक वर्षासाठी बीए, बीकॉम, बीएसस्सी, एमएसस्सी, एमबीए, मास कम्युनिकेशन, बीपीएड, फॅशन डिझाईन या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कात प्रचंड वाढ करून विद्यार्थ्यांची आर्थिक लुट सुरू केली आहे. अचानक केलेल्या या शुल्कवाढीमुळे विद्यार्थ्यांसमोर चिंतेचे सावट आहे. दरम्यान गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे पूर्ण करायचे असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

गोंडवाना विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे २०२४-२५ या शैक्षणिक सत्राच्या मध्यंतरी अचानक शैक्षणिक शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुल्क भरतांना त्रास सहन करावा लागत आहे. काही अभ्यासक्रमात तर इतकी प्रचंड शुल्क वाढ आहे की विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बीए अभ्यासक्रमाचे शुल्क आता सहा हजार रूपये केले आहे. त्या पाठोपाठ बीकॉम ६१०० रूपये, बीबीए ९०००, बीएफए ६०००, एमए तथा इतर सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम १० हजार, बीकॉम संगणक १० हजार, एमकॉम १० हजार, बीएसस्सी १० हजार, बीसीसी, बीसीए आयटी या अभ्यासक्रमासाठी १० हजार, एमएससी २० हजार, मास्टर ऑफ फॅशन डिझाईन ३७ हजार ७८२, बीए एलएलबी ३७ हजार ७८२, बीएससी बायो टेक्नोलॉजी, एमएससी या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क २० हजार पर्यंत वाढविले आहे, बीपीएड २३ हजार, एमबीए २५ हजार ३०० तसेच एलएलबी या अभ्यासक्रमाचे शुल्कात देखील प्रचंड मोठी वाढ केली आहे.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांच्या स्वाक्षरीने शुल्कवाढीचे पत्र निघाले आहे. आदिवासींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. मात्र भरमसाठ शैक्षणिक शुल्क वाढविले. त्यामुळे आदिवासी समाजातील गरीब विद्यार्थ्यांसोबतच इतरही गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण आता महाग झाले आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सत्र २०२४-२५ या सत्राच्या मध्यतरी शैक्षणिक शुल्कात अचानक भरमसाठ वाढ केल्याने विद्यार्थी चिंताग्रस्त आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या संलग्नीत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.

विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांची प्रत्यक्ष भेट घेवून विद्यापीठाने केलेल्या दरवाढीबाबत माहिती दिली. तेव्हा अहीर यांनी शैक्षणिक शुल्कात कपात करावी अशी मागणी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे केली आहे. २५ मार्च रोजी अहीर यांच्या नेतृत्वात भाजयुमोचे शिष्टमंडळ व विद्यार्थीनी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांची भेट घेत शुल्कवाढ रद्द करण्याचे निवेदन दिले व शैक्षणिक सत्राच्या मध्यतरी केलेले शुल्कवाढ हे विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही शुल्कवाढ तात्काळ रद्द करावी व विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.

कुलगुरु डॉ. बोकारे यांनी याबाबत येत्या दोन दिवसात योग्य निर्णय घेवू असे आश्वासन शिष्टमंडळास दिले. गोंडवाना विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात केलेली भरमसाठ वाढ ही अन्यायकारक आहे. ही वाढ गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य उध्वस्त करणारी आहे. तेव्हा ही शुल्कवाढ तत्काळ मागे घेण्यात यावी अशी मागणी सिनेट सदस्य प्रा.दिलीप चौधरी यांनी केली आहे. सिनेट बैठकीत देखील हा विषय प्रा.चौधरी यांनी उपस्थित करून कुलगुरूंचे याकडे लक्ष वेधले आहे.