चंद्रपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकांत प्रचारात सक्रिय भाजपच्या १९६ गाभा समितीच्या (कोअर कमिटी) सदस्यांचे शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ असे श्रेणीकरण (ग्रेडेशन) केले आहे. ‘ए’ म्हणजे उत्कृष्ट, ‘बी’ म्हणजे कमकुवत आणि ‘सी’ म्हणजे सर्वांत कमकुवत बुथ संरचणा, अशा पद्धतीचे हे श्रेणीकरण आहे. ‘बी’ आणि ‘सी’ श्रेणीकरणात भाजपच्या दोन्ही माजी महापौर, माजी नगरसेवक, जिल्हा महामंत्री, युवा मोर्चा अध्यक्ष, लोकसभा निवडणूक प्रमुख, ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्र्यांच्या पुत्राचा समावेश आहे. ही यादी समाज माध्यमावरील गाभा समितीच्या समूहात सार्वत्रिक होताच भाजप पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यात २०२४ या वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्या. लोकसभा निवडणुकीत भाजपला अपयश आले, तर विधानसभा निवडणुकीत सहापैकी पाच आमदार भाजपचे निवडून आले. आता या यशापयशाचे मोजमाप केले जात आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष पावडे यांनी भाजपच्या गाभा समितीतील १९६ पदाधिकाऱ्यांची यादी तयार केली. त्यात माजी महापौर, माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ‘ग्रेडेशन’ दिले. त्यानुसार स्वत: पावडे यांच्यासह ज्येष्ठ नेते राजेंद्र गांधी, प्रज्वलंत कडू, रामपाल सिंग, राजीव गोलीवाल, नामदेव डाहुले, महिला अध्यक्ष सविता कांबळे, मनोज सिंघवी, अजय सरकार, मनोज पोतराजे, अनिल डोंगरे, रवी जोगी, आशा आबोजवार, संगीता खांडेकर यांच्यासह ६९ जणांना ‘ए’ म्हणजे उत्कृष्ट काम केल्याची श्रेणी दिली गेली, तर ‘बी’ म्हणजे कमकुवत बुथ संरचना असलेल्यांमध्ये माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी नगरसेविका छबू वैरागडे, किरण बुटले, युवा मोर्चा अध्यक्ष विशाल निंबाळकर, माजी नगरसेवक संदिप आवारी, रवी आसवानी, शितल गुरनुले, वनिता डुकरे, चंद्रकला सोयाम, शीतल आत्राम, अशा ४० जणांचा समावेश आहे. सर्वात वाईत कामगिरी असलेल्या ‘सी’ श्रेणीत लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद कडू, ज्येष्ठ नेते विजय राऊत, माजी महापौर अंजली घोटेकर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोटटूवार, अनिल फुलझेले, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचे सुपूत्र रघुवीर अहीर यांच्यासह ८७ कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा समावेश आहे.

हेही वाचा – वर्षभरात राज्यातील २२ वाघांचा मृत्यू, कारणे काय?

यादी प्रदेश भाजपकडे

पावडे यांनी ही यादी भाजप कोअर कमिटीच्या समूहावर टाकताच ‘बी’ व ‘सी’ श्रेणी मिळालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. ज्यांनी निवडणुकीत काम केले नाही, घरातून बाहेर पडले नाही, अशांना ‘ए ग्रेड’ दिला आहे, तर ज्यांनी निवडणुकीत दिवसरात्र परिश्रम घेतले, ज्यांच्या प्रभागात भाजप उमेदवाराला मताधिक्य मिळाले, त्यांना ‘बी’ व ‘सी’ श्रेणी दिली गेल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, ही यादी प्रदेश भाजपकडे पाठवण्यात आल्याने पदाधिकारी चांगलेच संतापले आहेत.

हेही वाचा – नागपूर विद्यापीठात पुन्हा राजकारण तापले, शिक्षण मंचाच्या उमेदवाराचे निवडणूक अर्ज अवैध

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बुथची कामगिरी पाहून श्रेणीकरण करण्यात आले आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी बुथ अधिक सक्षम करता यावा, हा यामागील उद्देश आहे. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ही यादी सोपवण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत अधिक जोमाने काम करता यावे यासाठीची ही तयारी आहे. – राहुल पावडे, भाजप शहराध्यक्ष, चंद्रपूर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur grading of performance in elections deep resentment among bjp officials rsj 74 ssb