चंद्रपूर : धुळीच्या प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या या जिल्ह्यात भूजल प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात आहे. या जिल्ह्यातील ५९८ गावे भूजल प्रदूषणाने बाधित आहे. भूजल प्रदूषित गावात २१ हजार १६८ पिण्याच्या पाण्याचे नमूने तपासले असता फ्लोराईड, नायट्रेट, क्षार, लोहखनिज व जिवाणू बाधित पाणी आढळून आले आहे. अनेक गावातील पाणी तर पिण्यायोग्य नसल्याची धक्कादायक बाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाहणीतून समोर आली आहे.

या जिल्ह्याला धुळीच्या प्रदूषणाने ग्रासले आहे. महाऔष्णिक वीज केंद्राच्या सर्व संचातून बाहेर पडणारी विषारी फ्लाय ॲश, यामुळे अख्ये चंद्रपूर शहर प्रदूषित झाले आहे. लोकांना श्वास घेतांन त्रास होत आहे. मागील दोन महिन्यात तर धुळीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांना श्वास घेणे, त्वचा, ऱ्हदयविकार तसेच इतर विविध आजाराने ग्रासले आहे. कोळसा, फ्लाय ॲश तथा सिमेंट घेवून जाणाऱ्या ट्रकांच्या वाहतुकीमुळे आणि वेकोलिच्या कोळसा खाणीमुळेही प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यात आता भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात भूगर्भातील पाणी नमूने दूषित अर्थात प्रदूषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वक्षणानुसार जिल्ह्यात एकूण २१ हजार १६८ पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले आले. त्यात ३९३ नमुने फ्लूराईड ने बाधित असल्याचे दिसून आले.

नायट्रेट ने बाधित ७५५ नमुने तर क्षार बाधित १०० नमुने आहेत. लोहखनिज बाधित ६ ,जिवाणू बाधित ३१६ नमुने आढळली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील एकूण ५९८ गावे वरील काही प्रदूषणाने बाधीत आढळली आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. तालुका निहाय दूषित गावे बघितली तर वरेरा तालुक्यात सर्वाधिक ७२ गावातील भूगर्भातील पाणी दूषित आहे. त्यानंतर ब्रम्हपुरी ७१, सावली ६१, नागभीड ५२, सिंदेवाही ५३. मूल ४९, कोरपना ४१, भद्रावती व चंद्रपूर प्रत्येकी ३९ गावे, चिमूर ३६, राजुरा २९, गोंडपिंपरी २२, पोंभूर्णा १५ ,जिवती १० व बल्लारपुर तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे.

भूगर्भातही प्रदूषण वाढल्याने लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ग्रामीण भागात बहुसंख्य ग्रामस्थ नदी, नाल्याचे पाणी पित असल्याची धक्कादायक बाब यातून समोर आली आहे. तसेच शुध्द पाणी ग्रामीण भागातील लोकांना मिळणे आता दिवसेंदिवस कमी होत आहे. अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा होतो. मात्र यातही अशुध्दच पाणी राहत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी बहुसंख्य गावातील भूजल पाणी अशुध्दच आहे असे म्हटले आहे.

Story img Loader