चंद्रपूर : भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. चार वेळचे खासदार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपाने आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून मुनगंटीवार यांना संधी देण्यात आली. लोकसभा निवडणूक लढण्याची मुळीच इच्छा नाही, मात्र पक्षाने आदेश दिला तर रिंगणात उतरणार, असे मुनगंटीवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. मंगळवारी विकासकामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली होती की, मला लोकसभा लढायची नाही, आता तुम्हीच मला राज्यात थांबविण्यासाठी प्रयत्न करा. मात्र, भाजपा पक्षश्रेष्ठींनी मुनगंटीवार यांनाच उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा >>>वडिलांच्या जागी मुलाला उमेदवारी; भाजपाकडून अकोल्यातून अनुप धोत्रे निवडणूक रिंगणात

अशी आहे राजकीय कारकीर्द….

मुनगंटीवार १९८७-८८ सालापासून राजकारणात सक्रिय आहेत. १९८९ या वर्षी मुनगंटीवार यांनी चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढविली होती. मात्र, काँग्रेसचे माजी अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर १९९१ या वर्षी मुनगंटीवार पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तेव्हा देखील काँग्रेसचे शांताराम पोटदुखे यांनीच मुनगंटीवार यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला. आर्य वैश्य (कोमटी) या अल्पसंख्याक समाजातून येणारे मुनगंटीवार यांना लोकसभेची पायरी चढणे कठीण आहे, हे लक्षात येताच त्यांनी १९९५ मध्ये चंद्रपूर विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांनी राज्याचे माजी राज्यमंत्री, काँग्रेस नेते शाम वानखेडे यांचा पराभव केला होता. त्यानंतर मुनगंटीवार यांनी राजकारणात कधीच मागे वळून पाहिले नाही. एकेक करून पायऱ्या चढत गेले. १९९९ मध्ये युती सरकारच्या काळात सहा महिन्यांसाठी सांस्कृतिक विभागाचे मंत्री झाले. त्यानंतर २००४, २००९, २०१४, २०१९ अशा सलग निवडणुका जिंकल्या. मतदार संघ पुनर्रचनेत मागील तीन विधानसभा निवडणुकीत त्यांनी बल्लारपूर मतदार संघातून निवडणूक लढवून विजय संपादन केला. राज्याच्या मंत्रिमंडळात अर्थखात्याचे मंत्री तसेच वनमंत्री म्हणून यशस्वी काम केले. महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी यशस्वी काम केले आहे.

हंसराज अहीर समर्थकांमध्ये नाराजी

मुनगंटीवार यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळणार हे जवळपास ठरले होते. तरीही माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर उमेदवारीसाठी दिल्लीत ठाण मांडून बसले होते. मात्र, अहीर यांना तिकीट खेचून आणता आले नाही. मंगळवारी सायंकाळी मुनगंटीवार यांचे नाव जाहीर होताच अहीर समर्थकांमध्ये नाराजी पसरली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अहीर यांचा ४४ हजार मतांनी पराभव झाला होता. हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे यावा, यासाठी मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. मुनगंटीवार आता भाजपाला येथून विजय मिळवून देतात, की तेही अपयशी ठरतात, हे येणारा काळच सांगेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur guardian minister sudhir mungantiwar announced lok sabha election candidature rsj 74 amy
Show comments