चंद्रपूर : कुख्यात गुंड हाजी सरवर शेख (४४) याची हत्या त्याचा एकेकाळचा मित्र समीर शेख उर्फ प्रमोद वेळोकार याने त्याच्या पाच सहकाऱ्यांसह मिळून केली. पैशाच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हत्येप्रकरणी सहा आरोपींनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली, तर नागपुरातील दोन आरोपी अद्याप पसार आहेत.
मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील रहिवासी असलेला समीर हा हाजी सरवरचा मित्र होता. राजकीय आशीर्वादाने हाजीने गुन्हेगारी विश्वात स्वत:चा दबदबा निर्माण केला. या दोघांची पहिली भेट २००९ मध्ये झाली होती. त्यानंतर दोघेही मिळून कोळसा खाण परिसरात गुन्हेगारी आणि कालांतराने अवैध व्यवसाय करू लागले. दोघांनी अनेकदा एकत्र तुरुंगवाऱ्याही केल्या. समीरने (आदीचा प्रमोद) एका मुस्लीम युवतीशी लग्न करण्यासाठी मुस्लीम धर्म स्वीकारला होता. यानंतर तो समीर सरवर शेख झाला. हाजीने त्याला आपल्या वडिलांचे नाव आणि आडनाव दिले.
हेही वाचा – गुन्हेगाराने थेट मुंबईत थाटले बनावट नागपूर सायबर पोलीस ठाणे
मध्यंतरी एका प्रकरणात दोघेही नागपूरच्या कारागृहात बंदीस्त होते. हाजीची जामिनावर सुटका झाली, मात्र समीर कारागृहातच राहिला. तेव्हापासूनच त्यांच्यात वैरत्व आले. समीरला हाजीच्या एका नाजूक प्रकरणाचा सुगावा लागला. त्यामुळे तो सुडाने पेटून उठला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने हाजीकडे त्यांच्या वाट्याचे पैसे मागितले. हाजीने ते देण्यास टाळाटाळ केली. तडजोडीसाठी मध्यंतरी दोघांची नागपूर येथे एक बैठकही झाली. ती निष्फळ ठरली. यामुळे समीरने हाजीला कायमचे संपविण्याचे ठरवले.
दुसरीकडे, हाजीच आपल्याला मारणार असल्याची माहिती समीरला मिळाली. समीरने हाजीला संपवण्याची योजना दिग्रस येथे तयार केली. त्याने दिग्रस येथून श्रीकांत अशोक कदम, प्रशांत उर्फ राजेंद्र मोटवाणी, नागपुरातून नामदेव ढगे आणि हाजी याचे मूळ गाव असलेल्या नकोडा येथून राजेश मुलकवार यांना सोबत घेतले. सोमवारी या सर्वांनी हाजीवर गोळीबार आणि चाकूहल्ला करीत त्याचा काटा काढला. यानंतर पाचही जणांनी स्थानिक गुन्हे शाखेत आत्मसर्मपण केले.
हेही वाचा – “तुम्ही वैद्यकीय सुविधा देण्याऐवजी अडथळा निर्माण करत आहात,” न्यायालय असे कोणाला म्हणाले…
घुग्घुसमध्ये तणावपूर्ण शांतता
या हत्याकांडानंतर घुग्घुस शहरात तणावपूर्ण शांतता आहे. नकोडा येथील आरोपीच्या घराला पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. हाजीच्या पार्थिवावर मंगळवारी दफनविधी करण्यात आला. यावेळी त्याचे समर्थक मोठ्या संख्येने हजर होते. नकोडा आणि घुग्घुस येथील व्यापारी प्रतिष्ठाने सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आली होती.
या हत्याकांडाचा कट नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात शिजला. पैशाच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सहा आरोपींना अटक करण्यात आली असून फरार असलेल्या नागपुरातील दोन आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल. – मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर.