लोकसत्ता टीम
नागपूर : देशातील सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस इतकी सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातील चंद्रपूर येथे करण्यात आली. गेल्या वर्षी मे महिन्यात एवढीच तापमानाची नोंद या शहरात करण्यात आली होती.
चंद्रपूर हे देशातील पहिल्या क्रमांकाचे तर ओडिशातील झारसुगुडा हे ४५.४ अंश सेल्सिअससह दूसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले आहे. तर ४५ अंश सेल्सिअससह ब्रम्हपूरी हे तिसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले आहे. दरम्यान, २४ एप्रिलपर्यंत सलग तीन दिवस हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
सलग तीन दिवसांपासून राज्यात सूर्य तळपत आहे. तर मागील आठवड्याच्या अखेरपासून राज्याला उन्हाचा तडाखा बसत आहे. त्यातही विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असून पाठोपाठ मराठवाड्यात देखील तापमानाचा पारा वाढत आहे. यापूर्वी मे महिन्यात सर्वाधिक तापमानाच्या नोंदी होत होत्या.
मात्र, यावर्षी एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाच्या नोंदी होत आहेत. पहिल्यांदाच एप्रिल महिन्यातच तापमान ४५ अंश सेल्सिअस पलीकडे गेले आहे. त्यातही चंद्रपूर आणि ब्रम्हपूरी या शहरात सर्वाधिक तापमान नोंदवले जात आहे. रविवारी विदर्भातील जवळपास सर्वच शहरांमध्ये तापमान ४४ अंश सेल्सिअसपलीकडे होते. तर सोमवारी चंद्रपूर आणि अकोला या शहरात पारा ४५अंश सेल्सिअसवर पोहोचला.
दिवसाच नाही तर रात्रीचे तापमानदेखील सामान्यापेक्षा अधिक आहे. बुलढाणा वगळता विदर्भातील जवळपास सर्वच शहरांमध्ये तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअसपलीकडे गेले आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊनच हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
या शहरांना ‘येलो अलर्ट’
हवामान खात्याने पुढील तीन दिवस नागपूरसह अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या शहरांना ‘येलो अलर्ट’ दिला आहे. तर पुढील चार ते पाच दिवस तापमान याच पद्धतीने वाढलेले राहील. पूर्व विदर्भात प्रामुख्याने तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. विदर्भासह मराठवाड्यात देखील तापमानात याच पद्धतीने वाढ होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात देखील उन्हाचे चटके बसणार आहेत. उष्णतेच्या लाटेचा इशारा तीन दिवसांसाठी असला तरीही उन्हाचा तडाखा मा़ कायम असणार आहे. एप्रिल महिना संपण्यास अजून आठ दिवस बाकी असताना आणि उष्णतेच्या लाटेचा हवामान खात्याने दिलेला इशारा पाहता एप्रिल एखेरपर्यंत आणखी तापमानात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सर्वाधिक तापमानाच्या नोंदी
चंद्रपूर (महाराष्ट्र)- ४५.६
झारसुगुडा (ओडिशा) – ४५.४
ब्रम्हपूरी (महाराष्ट्र)- ४५
सिधी (मध्यप्रदेश) – ४४.६
अमरावती (महाराष्ट्र) – ४४.६
राजनंदगाव (छत्तीसगड) – ४४.५
अकोला (महाराष्ट्र) – ४४.१