चंद्रपूर : मोहरम हा सण मुस्लिम व हिंदू धर्मिय एकत्र येवून उत्साहात साजरा करतात. चंद्रपूरचे कारागृह दरवर्षी मोहरम निमित्त सर्वसामान्यांसाठी दोन दिवस खुले करण्यात येते. यावर्षी देखील कारागृत १६ व १७ जुलै रोजी खुले केले गेले. मोहरमनिमित्त मुस्लिम व हिंदू बांधवांनी चंद्रपूरच्या कारागृहात बाबा हजरत मखदुम शहाबुद्दीन शाहा उर्फ गैबीशहा वली र.त. यांच्या दर्ग्याचे दर्शन घेत एकतेचा संदेश दिला.
चंद्रपूरच्या कारागृहाला ऐतिहासिक महत्व आहे. कधी काळी गोंडराजाचा महल असलेली ही इमारत इंग्रजांच्या काळात कारागृह म्हणून त्याचा वापर करायला सुरुवात झाली. याच कारागृहाच्या परिसरात इंग्रजांविरुद्ध लढलेला आदिवासी स्वातंत्र योद्धा बाबुराव फुलेश्वर शेडमाके याला फाशी दिली गेली. याच ऐतिहासिक कारागृहात मोहरम हा सण उत्साहात साजरा होतो.
हेही वाचा – नागपूर : व्हिएनआयटीतील रस्ता अखेर सुरू, पण वाहतूक कोंडी कायम
विशेष म्हणजे, मोहरम निमित्त कारागृह दोन दिवस सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येते. संपूण विदर्भात ख्याती असलेल्या या दर्ग्याच्या दर्शनासाठी मुस्लिम बांधवासह शेकडो हिंदू बांधवांनी हजेरी लावत दर्ग्याचे दर्शन घेत माथा टेकला. त्यामुळे सर्वांना हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन बघायला मिळाले. बाबा हजरत मखदुम शहाबुद्दीन शाहा उर्फ गैबीशहा वली र.त. यांच्या दर्ग्यांचे दर्शन घेतल्यानंतर कारागृहात असलेल्या विहिरीचे पवित्र जल प्राशन करतात. कारागृहातील विहिरीच्या पाण्यामुळे अनेक रोग दूर होतात असे सांगितले जाते.
जिल्ह्यात मोठ्या उत्साहात मोहरम साजरी करण्यात येते. मुस्लीम बांधवांसह हिंदू बांधवही मोहरम साजरी करतात. मोहरम मासारंभापासून साजरी करण्यास सुरुवात होते. चंद्रपूरच्या जिल्हा कारागृहात बाबा हजरत मखदुम शहाबुद्दीन शाहा उर्फ गैबीशहा वली र.त. यांचा दर्गा आहे. या दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी मंगळवार व बुधवार हे दोन दिवस कारागृह सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले होते. त्यामुळे मंगळवारपासूनच कारागृहात दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकाच्या रांगा लागल्या होत्या.
दर्गा परिसरात असलेल्या विहिरीतील गोड पाण्याला विशेष महत्व असून हे पाणी प्राशन केल्याने सर्व रोग दूर होतात असे सांगितले जाते. त्यामुळे भाविकांनी पाणी प्राशन केल्यानंतर घरीसुद्धा घेवून गेले. तसेच दर्गा परिसरात जाण्यासाठी शहरातील मुख्य मार्गांवर संदलची मिरवणूक काढण्यात आल्या होत्या. दर्गा परिसरात मोठ्या संख्येने भाविक आल्याने गिरणार चौक परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. मोहरम निमित्त या ऐतिहासिक कारागृहात जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनीही दर्ग्याचे दर्शन घेतले.
हेही वाचा – नदी, नाले सरकारी संपत्ती, नागपुरात जमीन महसूल कायद्याचा भंग ?
विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी तथा सर्वसामान्य या दर्गाचे दर्शन घेतात व तेथील पाणी प्राशन करतात. गेल्या कित्येक वर्षांपासून या निमित्ताने हिंदू मुस्लीम ऐक्य येथे बघायला मिळते. मोहरमनिमित्त चंद्रपूर कारागृहातील हजरत मखदुम उर्फ गैबीशाह वली दर्ग्यावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शरबत वितरण करण्यात आले.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, सलीम शेख, ताहिर हुसेन, अबरार शेख, रजिक खान, असलम शेख, शहबाज खान, प्रवीण कुलटे, सायली येरणे, अनिता झाडे, माधुरी निवलकर, नंद पंधरे, शांता धांडे, अल्का मेश्राम आदींची उपस्थिती होती.