चंद्रपूर : लोकसभेच्या चंद्रपूर-वणी-आर्णी मतदार संघात प्रचाराच्या आज शेवटचा दिवशी भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून मेळावे, बैठका, नाराजांच्या गाठीभेटी तथा जनसंपर्कावर भर देण्यात आला. प्रचारात काँग्रेसकडून प्रामुख्याने हुकूमशाही विरूध्द लोकशाही, संविधान बचावचा नारा दिला गेला तर, भाजपकडून मोदी सरकार व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात केलेली विकासकामे यावर प्रचार केंद्रीत ठेवला. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी तर काँग्रेसकडून कन्हैयाकुमार या दोन मोठ्या सभा झाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यात शुक्रवार १९ एप्रिलला मतदान आहे. रामनवमीच्या मिरवणुकने १७ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता प्रचार तोफा थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे सुधीर मुनगंटीवार यांनी गायत्री परिवार बैठक, यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून मेळावा, कामगार मेळावा घेतला. तर महाआघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी नाराजांची भेट घेतली, बैठका, मेळाव्याच्या माध्यमातून जनसंपर्क साधला. राम नवमी असल्याने उमेदवारांनी सायंकाळी प्रत्यक्ष राम नवमीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्त दोन्ही उमेदवारांनी मिरवणूकीत सहभागी होवून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या. प्रचारतोफा थंडावल्या असल्या तरी, सायंकाळपासून छुपा प्रचार सुरू झाला आहे. येथे भाजप विरूध्द काँग्रेस अशी सरळ लढत आहे.

हेही वाचा…विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?

प्रचाराच्या सतरा दिवसांच्या कालावधीत काँग्रेसच्या धानोरकर यांच्याकडून हुकूमशाहीविरूध्द लोकशाही, संविधान बचाव, मोदी सरकार सत्तेत आल्यास २०२९ मध्ये निवडणुका होणार नाही, महागाई, बेरोजगारी या प्रमुख मुद्यावर निवडणूकीचा प्रचार केंद्रीत केला गेला. काँग्रेसला स्टार प्रचारकांची मोठी सभा घेता आली नाही. काँग्रेसचे राहूल गांधी, प्रियंका गांधी यांच्या सभा होवू शकल्या नाही. केवळ कन्हैया कुमार, खासदार. इम्रान प्रतापगडी या दोनच मोठ्या प्रचारसभा झाल्या. तर काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला,खासदार मुकूल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत कॉग्रेसचा मेळावा झाला.

हेही वाचा…बुलढाणा: सात दशकात अपक्षांनी विजयाचा गुलाल उधळला

काँग्रेसचे स्टार प्रचारक व विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मूल येथे एकमेव सभा घेतली. विशेष म्हणजे वडेट्टीवार यांनी प्रचारातून पूर्णपणे अंग काढून घेतलेले दिसले. तर भाजपकडून केंद्रातील नरेंद्र मोदीं सरकारने केलेला विकास, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असलेले १२ हजार रूपये व इतर मुद्यांवर प्रचार केला. सोबतच मंत्री मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात केलेली विविध विकास कामे या मुद्यांवर प्रचारात जोर देण्यात आला. महायुतीचे उमेदवार मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशाल जाहीर सभा झाली. तसेच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीनी गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, चित्रा वाघ, सिने अभिनेता सुनिल शेट्टी, रविना टडंन यांच्या प्रचारसभा व रोड शो पार पडले. वंचितचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ ॲड.प्रकाश आंबेडकर, माजी पोलिस अधिकारी अब्दुल रहेमान यांची सभा झाली. अखेरच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाटीवर अधिक लक्ष दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur lok sabha constituency conclude campaign congress has only two big meet bjp did narendra modi and big leaders of party public meet rsj 74 psg